वैभव सूर्यवंशीबद्दल आता भाष्य करणे चुकीचे, कपिल देव यांनी दिले विनोद कांबळीचे उदाहरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैभव सूर्यवंशीला हिंदुस्थानच्या क्रिकेटचा नवा स्टार मानले जात आहे. त्याने देशाच्या टी-20 संघात आपले स्थान पक्के केले आहे, परंतु वरिष्ठ खेळाडूंची संख्या जास्त असल्याने त्याला सामने खेळण्याची मर्यादित संधी मिळत आहे. वैभवची तुलना अनेकदा सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गजांशी केली जाते, परंतु हिंदुस्थानला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी त्याची तुलना विनोद कांबळीशी केली आहे. कपिल देव यांचा दृष्टिकोन थोडा आश्चर्यकारक आहे. परंतु त्यांनी स्पष्ट केले की, त्यांची चिंता योग्य आहे. कारण एक विश्वविजेता कर्णधार म्हणून त्यांनी अनेक अत्यंत प्रतिभावान तरुण खेळाडूंना प्रसिद्धी मिळाल्यानंतर अपयशी होताना पाहिले आहे.

दोन वर्षे धावा करणे महत्त्वाचे नाही

कपिल देव यांनी या तरुण खेळाडूच्या वर्तनावर जोर देत म्हटले, ‘जेव्हा त्याची जीवनशैली बदलेल तेव्हा त्याची विचारसरणीही बदलेल. मग आपल्याला कळेल की पुढच्या दोन वर्षांत तो कसा खेळेल. त्याची कामगिरी पाहण्यापेक्षा हे अधिक महत्त्वाचे आहे. वैभवच्या आधी पृथ्वी शॉसुद्धा खूप लहान वयात हिंदुस्थानच्या संघात सामील झाला होता, मात्र त्यालाही स्टारडमचा आनंद घेता आला नाही आणि आपल्या वाईट सवयींमुळे तो वादांमध्ये अडकला. आता पृथ्वीचे पुनरागमन अत्यंत कठीण दिसत आहे.

कपिल देव काय म्हणाले?

कपिल देव म्हणाले की, ‘वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबद्दल आत्ताच अंदाज लावणे योग्य नाही. किमान दोन वर्षे त्याच्या जीवनशैलीवर लक्ष ठेवले पाहिजे. पैसे मिळाल्यानंतर त्याचे आयुष्य बदलेल आणि त्याची विचारसरणीही बदलेल. त्यानंतर तो गोष्टी कशा हाताळतो आणि आपल्या खेळाशी किती एकनिष्ठ राहतो, हे आपल्याला दिसेल. आता काही सांगणे खूप घाईचे होईल. त्याच्यात क्षमता आहे, पण क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू होऊन गेले आहेत, जे प्रचंड प्रतिभा घेऊन आले आणि नंतर गायब झाले. विनोद कांबळीकडे बघा. आपण त्याबद्दल काय म्हणू शकतो? वैभव 15 वर्षांचा आहे. त्याला आणखी तीन वर्षे द्या, मग आपण बोलू.’