
सामना प्रतिनिधी । कराड
स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याशी खेळणारा व आर्थिक खर्चात वाढ करणारा कारभार सुरू आहे. याविरोधात शिवसेना महिला आघाडीने आवाज उठवला आहे. याबाबतचे निवेदन वैद्यकीय अधिक्षकांना देण्यात आले असून यामध्ये सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेनेच्या पदाधिकारर्यांना अनेक गोरगरीब महिलांनी स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत तक्रारी दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी या रुग्णालयातील वाईट अनुभव कथन केला आहे. इतकेच काय शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनाही या रुग्णालयातील अनुभव चांगला नाही. याचाच अर्थ स्व. सौ वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील अनुभव चुकीचा व बेजबाबदारपणाचा आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कराड तालुका व कराड शहर परिसरातील गोरगरिबांचे आश्रयस्थान व आरोग्याची काळजी घेणारे रुग्णालय म्हणून कॉटेज हॉस्पिटलकडे पाहिले जाते. परंतू प्रत्यक्षात मात्र विचित्र प्रकार अनुभवास येत आहे. गोरगरिबांची आर्थिक परिस्थिती नसल्याने हालअपेष्टा सहन करत या रुग्णालयात येतात. परंतु सर्व सुविधा व सुसज्ज व्यवस्था फक्त कागदावरच आहे का? स्थानिक डॉक्टरांचे हित जपायचे आहे की काय? असा प्रश्न निवेदनात करण्यात आला आहे.
कॉटेज हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्षात सोनोग्राफीची मशिन असताना देखील बाहेरील खासगी हॉस्पिटल किंवा सोनोग्राफी सेंटरची तोंडी अगर लेखी चिट्टी दिली जाते. जिल्हयातील उपजिल्हा रुग्णालय हे एवढ्या मोठ्याप्रमाणात विस्तारलेले असून देखील एम.डी. डॉक्टर उपस्थित नाहीत असे सांगितले जाते. त्यामुळेच खाजगी रुग्णालयाकडे रुग्णांची धाव दिसत आहे. परंतु अशा परिस्थितीत गरीब रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी जायचे कुठे? असा सवाल शिवसेनेने निवेदनाद्वारे विचारला आहे. तरी लवकरात लवकर सोनोग्राफी मशिन व इतर आवश्यक सुविधा सुरू कराव्यात अन्यथा याविरोधात आंदोलन छेडावे येईल असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
शिवसेना कराड दक्षिण उत्तर संपर्क संघटिका सुवर्णाताई शेवाळे, शिवसेना महिला आघाडी सातारा जिल्हा संघटिका अनिता जाधव, शिवसेना कराड तालुका दक्षिण संघटिका कलावती माळी, कराड तालुका उत्तर संघटिका चित्रा महाडिक, कराड उत्तर विभाग संघटिका अश्विनी कदम, कराड शहर संघटिका वैशाली मोरे, कराड उत्तर विभाग संघटिका शारदा काटे, कराड दक्षिण तालुका संघटिका शोभा लोहार, संगीता गोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, राजेंद्र माने, शहरप्रमुख शशिकांत करपे, अक्षय गवळी, शेखर बर्गे, कुलदीप जाधव, प्रमोद तोडकर, अजित पुरोहित, प्रमोद वेर्णेकर, मनोज गायकवाड, अशोक शिंदे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.
कराडमध्ये उपजिल्हा रुग्णालय असूनदेखील अपंगत्वाचा दाखला कराडमध्ये दिला जात नाही. यासाठी सातारा येथे जावे लागते, तेव्हा महिन्यातून एक दिवस हा दाखला देण्यासाठी कराडला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, अशी मागणीही शिवसेना महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.



























































