कर्नाटक भाजपातही अंतर्गत वादाचा उद्रेक, मुख्यमंत्री येडियुरप्पांना हटवण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडपाठोपाठ कर्नाटकमध्येही भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना हटवण्याची मागणी भाजप आमदार बसनगौडा यतनाल यांनी केली आहे. भाजपला कर्नाटकमध्ये टिकायचे असेल तर मुख्यमंत्री 100 टक्के बदललाच पाहिजे. आम्ही येडियुरप्पांसोबत पुढील निवडणुकीचा प्रचार करणार नाही, अशी रोखठोक भूमिका यतनाल यांनी मांडली आहे. याअंतर्गत कुरबुरीमुळे भाजपची चिंता चांगलीच वाढली आहे.

उत्तराखंड भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आल्यानंतर तेथे त्रिवेंद्र सिंह रावत यांची उचलबांगडी करून तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. तेथील बंडाचे वादळ थंडावत नाही तोच कर्नाटक भाजपमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. येडियुरप्पांच्या कार्यपद्धतीवर आमदार यतनाल यांनी पक्षश्रेष्ठीकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुढील निवडणुकीत येडियुरप्पा हे भाजपचे मुख्यमंत्री असू शकत नाही. राज्यात भाजपला आपले बस्तान कायम ठेवायचे असेल तर येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलेच पाहिजे. त्यांच्या जागी दुसऱयाची नेमणूक करणे यातच पक्षाचे हित आहे. या मागणीबाबत मी पक्षनेतृत्वाला माहिती दिली आहे. मुख्यमंत्री नक्कीच बदलणार, असे यतनाल यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसने जनता दल सेक्युलरसोबत (जेडीएस) सरकार स्थापन केले होते. मात्र आमदारांची नाराजी व त्यातून काहींनी दिलेले राजीनामे यामुळे काँग्रेस-जेडीएसचे सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना राजीनामा द्यावा लागला होता. ही संधी साधत भाजपने सरकार स्थापन केले होते, परंतु आता अंतर्गत वादामुळे भाजपच्या येडियुरप्पा सरकारलाही ग्रहण लागले आहे.