
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
कर्नाटकात आज तीन लोकसभा आणि दोन विधानसभेच्या जागांसाठीच्या पोटनिवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये भाजपला फटका बसला असून काँग्रेस-जेडीएसने आपलं वर्चस्व राखलं आहे. तीन पैकी केवळ लोकसभेच्या एकाच जागेवर भाजप जिंकली तर अन्य दोन जागांवर काँग्रेस जेडीएने बाजी मारली. त्यामुळे लोकसभेत भाजपचा आकडा आतापर्यंत 10ने घसरून 272 वर येऊन पोहोचला आहे.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजपला 282 जागांवर विजय मिळाला होता. मात्र चार वर्षांत झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचं मोठं नुकसान झालं आहे. 2014 नंतर 30 ठिकाणी लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यातील 16 जागा भाजपच्या होत्या. 16 जागांपैंकी भाजप अवघ्या 6 जागा जिंकू शकली आहे, तर 10 जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या चार वर्षांत भाजपला लोकसभेच्या 10 जागांवर पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 282 पोहोचलेली भाजप चार वर्षात 272 वर पोहोचली आहे.
भाजपच्या लोकसभेतील या घसरणीमुळे 2019मध्ये काय होणार याचे संकेत मिळू लागले आहेत, असा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
2018: 10 पोटनिवडणुकांचा निकाल
बेल्लारी: भाजपची जागा काँग्रेसने जिंकली
शिमोगा: भाजपची जागा कायम ठेवण्यात यशस्वी
मांड्या: जेडीएसची जागा पक्षाने राखली
कैराना: भाजपची जागा आरएलडीने जिंकली
पालघर: भाजपने जागा राखली
गोंदिया-भंडारा: भाजपची जागा राष्ट्रवादीने जिंकली
नागालँड: एनडीपीपीने आपली जागा राखली
अररिया: आरजेडीने जागा राखली
फूलपूर: भाजपची जागा समाजवादीने जिंकली
गोरखपूर: भाजपची जागा समाजवादीने जिंकली
अलवर: भाजपची जागा काँग्रेसने जिंकली
अजमेर: भाजपची जागा काँग्रेसने जिंकली
उलबेरिया: टीएमसीने जागा राखली




























































