
मक्याच्या कणसांनी भरलेली पोती अंगावर पडल्याने आठ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना कर्नाटकमधील विजयपुरा येथे घडली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. एका खासगी गोदामात हा अपघात घडला असून सर्व मृत मजूर हे बिहारचे असल्याची माहिती मिळत आहे.
मृतांपैकी पाच मजुरांची ओळख पटली आहे. विजयपुरा येथील एका खासगी गोदामात हे मजूर काम करत होते. त्यावेळी अचानक मक्याच्या कणसांनी भरलेली पोती या मजुरांच्या अंगावर धडाधड कोसळली. त्या पोत्यांच्या ढिगाखाली अनेक मजूर दबले जाऊन मृत्युमुखी पडले.
विजयपुरा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री एम. बी. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्य करणाऱ्या पथकांना सूचना दिल्या. कणसांच्या पोत्यांचा ढिग खूप मोठा असल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता. या गोदामात अशाच प्रकारची दुर्घटना यापूर्वीही घडली होती. मात्र, त्यावेळी हे प्रकरण दाबण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अशा प्रकारच्या घटना यापूर्वी घडलेल्या असल्याचा तपास करण्यात येईल, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.



























































