
सामना ऑनलाई । श्रीनगर
जम्मूमधील रत्नूचक लष्करी छावणीच्या बाहेर गस्त घालणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांवर दोन दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जवानांनीही त्यास चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला. त्यानंतर या भागात शोध मोहिम सुरू करण्यात आली असून जवान दहशतवाद्यांचा कसून शोध घेत आहेत.
शनिवारी रात्री 2 च्या सुमारास लष्करी तळाच्या बाहेर जवानांना दोन व्यक्ती दिसल्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने जवानांनी इतर जवानांना सर्तकतेचा इशारा दिला. जवानांना आपल्याच दिशेने येताना बघून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर व लष्करी तळावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यामुळे हादरलेल्या दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जवानांनी लष्करी तळाला लागून असलेल्या सांबा जिल्हाला चारही बाजूंनी वेढा घातला आहे.
दरम्यान नववर्षाच्या सुरुवातीलाच जम्मू मधील संभाग भागात हल्ले घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. अशी माहिती गुप्तचर विभागाला कळाली होती. त्यामाहितीच्या आधारावर पोलीस व जवानांनी संयुक्तपणे कठुआतील डाभी गावातील जंगलात शुक्रवारपासून शोध मोहिम सुरू केली होती. यावेळी जंगलातून 24 ग्रेनेडीयर व मोठा शस्त्रसाठा जप्त केला . यात 2 एके 47, एके 47 मधील 256 काडतुसे, एक चीनी बनावटीचे ग्रेनेड व स्नायपर गनची 59 गोळ्या एवढा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. दरम्यान हा शस्त्रसाठा पाहता या भागात अजून काही दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शनिवारी पुलवामा जिल्हयातील हजिन राजपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली यात चार दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात आला होता. त्यानंतर रात्रभर या विभागात शोधमोहिम सुरू होती. यावेळी एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर या घराला जवानांनी चारही बाजूने घेरले होते.रात्री सुरू झालेली ही चकमक पहाटेपर्यंत सुरू होती. यात चार दहशतवादी ठार झाले आहेत.
Visuals from Ratnuchak Military station in Jammu where an exchange of fire took place between army guards and two suspects at around 2:00 am last night; Search operation is underway. #JammuAndKashmir pic.twitter.com/HUWjGUF6Oh
— ANI (@ANI) December 30, 2018
























































