पुन्हा टार्गेट किलिंग- कश्मीर अशांतच; पंडिताची गोळय़ा झाडून हत्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीर खोऱयात अशांतता कायम असून टार्गेट किलिंगचे सत्र सुरूच आहे. शोपियान जिह्यात दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून पूरण कृष्ण भट या कश्मिरी पंडित नागरिकाची निर्घृण हत्या केली. कश्मीर फ्रीडम फायटर (केएफएफ) या संघटनेने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

शोपियान जिह्यातील चौधरी गुंड भागात ही हत्या झाली. पूरण कृष्ण भट हे आपल्या घराजवळील बागेत जात होते. त्यावेळी आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. भट यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

पंडितांचे रास्ता रोको

कश्मिरी पंडितांना वारंवार टार्गेट करून हत्या केल्या जात आहेत. हे सरकारचे पूर्णपणे अपयश आहे. कश्मिरी पंडितांना पंतप्रधान रोजगार पॅकेजमधून येथे पाठविण्यात येते पण आमच्या सुरक्षेचे काय, असा सवाल पंडितांनी केला. हे सरकार मुके, बहिरे, आंधळे असल्याची संतप्त भावना पंडितांनी व्यक्त केली. दरम्यान, जम्मू-अख्नूर या मार्गावर रास्ता रोको आंदोलन कश्मिरी पंडितांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने पंडित एकत्र आले होते.