
सामना प्रतिनिधी । पुणे
फेसबुक व इतर माध्यमातून खलिस्तानी विचारांच्या तरुणांशी संपर्कात राहून घातपात घडविण्याचा कट रचने, कारागृहात बंद असलेल्या खलिस्तानींना बाहेर काढण्यासाठी टोळी स्थापना करण्याचा प्रयत्न असल्याचे एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून समोर आले आहे. या दोन दहशतवाद्यांचे पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचे कनेक्शनही समोर आल्याने याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) हस्तांतरीत केला आहे.
हरपालसिंग प्रतापसिंग नाईक (वय ४२, रा. पूजारहल्ली, बेल्लारी, कर्नाटक), मोहीउद्दीन सिद्दीकी उर्फ मोईन खान (वय ३७, रा. पूर्व घोकूलपूर, अमर कॉलनी, उत्तरपूर्व दिल्ली) या दोघांना महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. एसटीएने चाकण येथून नाईकला तर खानला पंजाब पोलिसांनी अटक केली होती. यानंतर खानला पंजाब पोलिसांनी एटीएसकडे वर्ग केले.
या दोघांवरही ‘बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्यानुसार’ (यूएपीए) कारवाई केली आहे. नाईक हा मूळचा पंजाब असला तरी तो अनेक वर्षांपासून बेल्लारी येथे रहात होता. त्याने फेसबुक व इतर सोशल मीडियाचा वापर करून खलिस्तानी विचार पसरवून तरुणांची माथी भडकविण्याचा प्रयत्न केला.
कारागृहात असलेल्या खलिस्तानवाद्यांना बाहेर काढण्यासाठी दहशतवादी टोळी स्थापन करणे, भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचविण्याबरोबरच खलिस्तान निर्मितीसाठी हत्यारे गोळा करण्यात खानचाही संबंध असल्याचे समोर आले आहे. त्याच्या सोशल मीडियावरील हालचाली आणि मोबाइल मधील डेटाच्या विश्लेषणातून समोर आले आहे. हरपालसिंग नाईत हा पाकिस्तान, सौदी अरेबिया येथील काही जणांच्या सातत्याने संपर्कात होता. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आल्याने याचा तपास एटीएसने एनआयएला दिला आहे.
























































