कोल्हापूर : कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आग, परिचारिका-वॉर्डबॉयमुळे अनर्थ टळला

icu-fire

कोल्हापूर जिल्ह्याचा दवाखाना आणि सध्या पूर्णवेळ कोरोना रूग्णालय म्हणून कार्यरत असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर) च्या ट्रॉमा आयसीयूमधील एका कक्षात, व्हेंटिलेटरला तांत्रिक बिघाडामुळे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या कक्षातील 15 रुग्णांना त्या ठिकाणी कार्यरत परिचारिका आणि वॉर्डबॉय यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बाहेर काढल्याने, मोठा अनर्थ टळला.

दरम्यान या धावपळीत व्हेंटिलेटर अभावी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची आणि बचावकार्यातील एका रक्षकाचा हात भाजल्याची चर्चा सुरू होती. मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी वा दुखापत झाली नसल्याचे सीपीआर प्रशासनाकडून अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी काही वेळाने स्पष्ट केले. पण सीपीआरमधील जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजी पणा दिसून आला आहे.

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालय ( सीपीआर) मध्ये सध्या 270 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यातील अनेक रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. येथील वेदगंगा इमारतीत ट्रॉमा केअर सेंटरच्या आयसीयू रूम नं. 2 मध्ये एका व्हेंटिलेटर मध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन, पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. त्यावेळी ड्यूटीवरील परिचारिका आणि वॉर्ड बॉय यांनी तात्काळ ड्राय पावडरचा फवारा करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या रूममध्ये उपचार घेणाऱ्या 15 गंभीर कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ अपघात विभागात हलविण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी दिली.

तसेच अग्निशमन दल, वरिष्ठ डॉक्टर्स, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान यांनी तात्काळ आग विझवल्याचे आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भेट देवून पाहणी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांची सायकलवरून धाव, तर जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा

या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच, जिल्हाधिकारी दौलत देसाई तातडीने सायकलने सीपीआर मध्ये पोहोचले. आग लागलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची पाहणी करून, येथील रुग्णांना खासगी दवाखान्यात हलवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सीपीआर हॉस्पिटल मधील एकही वरिष्ठ डॉक्टर, निवासी डॉक्टर उपस्थित नव्हते. आगीच्या ठिकाणी अडकलेल्या या रुग्णांना परिचारिका, वॉर्ड बॉय आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी बाहेर काढत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले. तात्काळ त्यांनी जबाबदार डॉक्टरांना फोन करून बोलवून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन बंद होते. अखेर निवासी कर्मचारी पाठवून, त्यांना बोलावून आणावे लागले. जिल्हा शल्य चिकित्सक ते सीपीआरचे अधिष्ठाता यांच्या कारभाराचा फटका यापूर्वीही बसला आहे. आज पुन्हा त्याचा प्रत्यय आला.

आपली प्रतिक्रिया द्या