
ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडावर गेली अनेक वर्षे नगरपालिकेच्या दारात पडून असणाऱ्या तोफांना तोफगाड्यांच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली. शिवराष्ट्र परिवारामार्फत पन्हाळगडावर महाराष्ट्र दिनी पारंपरिक वातावरणात तोफगाडे लोकार्पण सोहळा झाला.
बाल शिवाजी, जिजाऊ, मावळे यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप लाभले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव घोषणाने पन्हाळगड दुमदुमून गेला. शिवभक्तीचा प्रचंड उत्साह …सजवलेले तोफगाडे…भगवे झेंडे अशा उत्साही वातावरणात तोफांना महाराष्ट्र दिनी तोफगाड्यांच्या माध्यमातून मोठा सन्मान मिळाला.
यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे,तहसीलदार रमेश शेंडगे,नगरपालिका मुख्याधिकारी चेतनकुमार माळी,निवासी नायब तहसीलदार विनय कौलवकर,माजी नगराध्यक्ष रूपाली धडेल, विजय पाटील तसेच शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे,मोहन खोत,गणेश कदम,श्रेयश भंडारी,अतुल कापटे,रवींद्र तोरसे,दिनकर भोपळे आदींच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे म्हणाले, पन्हाळगडाला खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. शिवराष्ट्र परिवाराने तोफांचे केलेले संवर्धन हा खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे. पन्हाळगड संवर्धनासाठी जे काही करावे लागेल ते शासन पातळीवर आपण करू तसेच तोफांसह तोफगाड्यांचं संवर्धन होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे कायमस्वरूपी छत उभारले जाईल. शिवप्रेमींना हा पाच तोफांचा ऐतिहासिक ठेवा कायमस्वरूपी पहावयास मिळेल, असे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी म्हणाले.



























































