
मध्य रेल्वे अंतर्गत येणार्या पुणे ते कोल्हापूर रेल्वे दुतर्फा विद्युतीकरण कामाने वेग घेतला आहे.
सातारा रेल्वे स्थानक परिसरात ठिकठिकाणी क्रेनच्या सहाय्याने विद्युतीकरणासाठी खांब बसवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
रेल्वे स्थानकात दुहेरीकरणाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे. रेल्वे मंत्रालयाने पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गाच्या विद्युतीकरणासाठी 513 कोटींचा निधी दिला आहे. विभागीय रेल्वे आणि पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑल इंडिया मध्ये करार झाल्यानंतर हा निधी वर्ग करण्यात आला आहे.
कोल्हापूर ते पुणे 326 कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण होत आहे. सातारा येथील रेल्वे स्थानक परिसरात दुहेरीकरणासंदर्भातील प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. तसेच अधिकारी व कर्मचार्यांचे निवासस्थानही सातारा रेल्वे स्टेशन परिसरात बांधण्यात येत आहे. सातारा येथे रेल्वेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांचे कार्यालय होणार असून या कार्यालयातून पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा कार्यभार होणार आहे.
पुणे ते कोल्हापूर रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी भराव टाकण्याचे कामही सुरू आहे. तर काही ठिकाणी टेलिफोन विभागाचीही कामे रेल्वेने हाती घेतली आहेत. पुणे ते कोल्हापूर मार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाला सध्या चांगलीच गती मिळाली आहे. त्यानुसार कोल्हापूर ते पुण्यापर्यंतचा प्रवास चार तासात होणार आहे. तसेच या मार्गावरुन जादा गाड्या धावण्याचीही शक्यता आहे.
पुणे ते फुरसुंगी हे 12 कि.मी. विद्युतीकरणाचे काम पुर्ण झाले आहे.तसेच पुणे ते जेजूरी या 32 कि.मी. विद्युतीकरण काम पुर्णत्वास गेले आहे. तसेच शेणोली ते मिरज या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र रेल्वेच्या सिग्नल व टेलीकॉम डिपार्टमेंटचे काम सुरू आहे. हे कामही लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. रेल सुरक्षा आयुक्त या मार्गाची तपासणी करणार आहेत.
ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर रेल सुरक्षा आयुक्त त्याचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे पाठवणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर हा मार्ग सुरू होणार आहे.

























































