
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने घट होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत तब्बल पाच फुटांपेक्षा अधिक घट झाली आहे. अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी संभाव्य पुराचा धोका तूर्त टळला आहे. राधानगरीसह सर्व धरणे 75 ते 90 टक्के भरली आहेत.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिह्यात संततधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. पंचगंगा नदी 39 फुटांच्या इशारा पातळीपासून एक फूट कमी-जास्त स्थिर राहत असल्याने, पुराची धाकधूक कायम होती. संभाव्य पूर भागातील नागरिकांचे स्थलांतरही सुरू होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यात कर्नाटकातील अलमट्टी धरणातूनही मोठय़ा प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्याने, त्या पाण्यालाही पंचगंगेची इशारा पातळी गाठण्यापूर्वीच स्थिर ठेवण्यावर पाटबंधारे विभागाला यश आले. तासाला इंचाने उतरणारे पाणी आता झपाटय़ाने ओसरू लागले आहे. काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास 36.3 फुटांवर असलेली पंचगंगेची पाणीपातळी आज सायंकाळी पाचच्या सुमारास तब्बल 31.3 फुटांवर आली होती. सध्या 31 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यात 37 इमारतींची पडझड
पाऊस कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी घरे पडझडीच्या घटना घडत आहेत. गेल्या चोवीस तासांत जिह्यात 37 इमारतींची पडझड होऊन साडेदहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिह्यात झालेला दमदार पाऊस पिकांना पोषक असून, गेल्या आठ-दहा दिवसांच्या गारठलेल्या पिकांना हे वातावरण चांगले ठरत आहे. यामुळे बळीराजाही सुखावल्याचे चित्र आहे.



























































