
सामना प्रतिनिधी। कोल्हापूर
शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ रविवार 24 मार्च रोजी कोल्हापुरात फुटणार आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला साकडे घालून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तपोवनच्या भव्य मैदानावर दुपारी चार वाजता लाखो शिवसैनिक, भाजप आणि रिपाइंचे कार्यकर्ते, नागरिकांच्या साक्षीने प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. महायुतीच्या या महासभेच्या झंझावाताची उत्सुकता महाराष्ट्रासह अवघ्या देशाला लागून राहिली आहे.
जय्यत तयारी
महासभेची तपोवनच्या विस्तीर्ण मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. याशिवाय सभास्थानी ठिकठिकाणी भव्य स्क्रीन लावण्यात आले आहेत. महायुतीच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे. संपूर्ण कोल्हापूर शहरच भगवेमय झाले आहे.कोल्हापुरातील महायुतीच्या या पहिल्या प्रचारसभेच्या जय्यत तयारीवर शिवसेना नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि भाजप नेते सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील जातीने लक्ष ठेवून आहेत.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
शिवसेना-भाजप युतीच्या महासभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे रविवार, दि. 24 मार्च रोजी कोल्हापुरात येत आहेत. कळंबा रोडवरील तपोवन मैदानातील जाहीर सभा तसेच करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी सर्वजण येणार असल्याने या मार्गावर चारशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिर, विमानतळ मार्गावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सभास्थळी साध्या गणवेशातील पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. डॉग स्क्वॉडमार्फत परिसराची तपासणी करण्यात येणार आहे. उद्या रविवारी कोल्हापुरात अप्पर पोलीस अधीक्षक, दोन पोलीस उपअधीक्षक, सात पोलीस निरीक्षक, 24 पोलीस उपनिरीक्षक, 250 पोलीस, 50 होमगार्ड, वाहतूक शाखा कर्मचारी 50, बॉम्बशोधक पथक, राज्य राखीव दलाची तुकडी असा बंदोबस्त राहणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे या महासभेला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रासपचे महादेव जानकर, सदाभाऊ खोत आदी उपस्थित राहणार आहेत.
































































