
राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ऊसगळीत हंगामास आता चांगलाच वेग येत आहे. बुधवारपर्यंत राज्यात एकूण 596.99 लाख टन उसाचे गाळप होऊन 557.97 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, उताऱ्याची सरासरी 9.51 टक्के राहिली आहे. ऊसगाळपामध्ये सोलापूर जिल्हा, तर सरासरी साखर उताऱ्यासह साखर उत्पादनात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उतारा घटला आहे. गेल्या वर्षी उतारा 9.85 टक्के होता.
गेल्या वर्षी राज्यात 96 सहकारी व 95 खासगी अशा एकूण 191 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम केला होता. यंदा राज्यात 101 सहकारी व 97 खासगी अशा एकूण 198 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. 11 जानेवारीच्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण 47 कारखान्यांनी 147.92 लाख टन उसाचे गाळप करून 126.89 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 8.56 टक्के आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 34 कारखान्यांनी 137.88 लाख टन उसाचे गाळप करून 151.41 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथील साखर उतारा सर्वाधिक 10.95 टक्के आहे.
पुण्यातील 31 कारखान्यांनी 122.59 लाख टन उसाचे गाळप करून 119.86 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथील उतारा 9.51 टक्के आहे. नगर जिल्ह्यातील 26 कारखान्यांचे 75.47 लाख टन उसाचे गाळप होऊन 69.07 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तर, 9.15 टक्के उतारा मिळाला आहे. संभाजीनगरमध्ये 26 कारखान्यांनी 50.98 लाख टन उसाचे गाळप केले असून, 44.82 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. तर, 8.79 टक्के उतारा मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यात 29 कारखान्यांनी 51.80 लाख टन उसाचे गाळप करून 49.76 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथे उतारा 9.59 टक्के आहे.
अमरावतीत 2 कारखान्यांचे 4.42 लाख टन उसाचे गाळप होऊन 4.19 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथे 9.48 टक्के उतारा मिळाला. नागपुरात 4 कारखान्यांचे 2.39 लाख टन उसाचे गाळप होऊन 1.96 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तसेच, येथील साखरेचा उतारा 8.20 टक्के आहे.
सहकारी कारखान्यांचे एकूण 313.44 लाख टन उसाचे गाळप व 310.90 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. एकूण उतारा 9.92 टक्के आहे, तर खासगी कारखान्यांचे 281.89 लाख टन उसाचे गाळप होऊन, 257.01 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तर, साखरेचा उतारा 9.12 टक्के आहे.
























































