कोल्हारमध्ये लॉकडाऊन धाब्यावर बसवून व्यापाऱ्यांनी भरवला आठवडे बाजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
छाया : संजय शिवलेकर कोल्हार

शुक्रवारी कोल्हार भगवतीपूर मध्ये सरकारचे नियम धाब्यावर बसवून बाहेरील बाजारकरूंनी गावात बाजार मांडला अन ग्राहकांची एकच झुंबड उडाली. या बाजारात लॉकडाऊन आदेशाची अक्षरश: पायमल्ली झाली. या पार्श्वभूमीवर कोल्हार ग्रामपंचायतने पोलिसांच्या बंदोबस्तात गावातील अंतर्गत रस्ते बंद करून नाकाबंदी केली आहे.

शुक्रवारी कोल्हार भगवतीपुरचा आठवडे बाजार असतो. देशभर लॉकडाऊन असताना बाहेरील व्यापाऱ्यांनी बाजारात भाजीपाला आणला. त्यामुळे बाजारात तोबा गर्दी उसळली. अखेर लोणी पोलिसांना बाळाचा वापर करून सर्वांना हाकलून दिले. काहींवर माल जप्तीची कारवाई करावी लागली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शक्यतो सर्व उपाययोजना शासन स्तरावर सुरू आहेत. मात्र अशा प्रकारच्या बाजारकरूंच्या दुर्लक्षाने हा संसर्ग वाढण्यास वेळ लागणार नाही.यास बाहेरून येणारे बाजारकरू व व्यापारी जबाबदार असल्याने त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले.

माजी सरपंच अॅड सुरेंद्र खर्डे, माजी उपसरपंच स्वप्नील निबे, ग्रामसेवक शशिकांत चौरे यांनी कोल्हार ग्रामपंचायतच्या वतीने नाईलाजास्तव पोलिस बंदोबस्तात गावातील अंतर्गत रस्ते स्टीलचे पोल लावून बंद केले आहेत. यामुळे किमान गावातील अंतर्गत वाहतूक थांबु शकते. कोल्हार भगवतीपुरच्या अंतर्गत असलेल्या सर्व रस्त्यावर आता नाकाबंदी केली आहे. किमान यामुळे तरी ग्रामस्थ विनाकारण रस्त्यावर फिरणार नाहीत. अन आलेच तर पोलिसांचा प्रसाद मिळेल. तूर्तास दोन्ही गावची नाकाबंदी केल्याने ग्रामस्थ आतातरी घराबाहेर पडणार नाहीत अन किरोना संसर्ग रोखण्यास मदत होईल. मात्र नगर मनमाड राज्य मार्ग, बेलापूर रस्ता, सोनगाव रस्ता व राजुरी रोड दळणवळणाची खुला ठेवण्यात आला आहे.

कोरोना मुक्त गावासाठी निर्णय…!
बाहेरील भाजीपाला व्यापाऱ्यांनी अचानक गावात गर्दी केली. तर गावामध्ये अद्यापही काही टुकार युवक मोटरसायकल वरून विनाकारण फिरतात. त्यांना अटकाव व्हावा व कोरोनामुक्त गांव रहावं यासाठी लोणी पोलिसांना सोबत घेत स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन गावात अंतर्गत नाकाबंदी केली आहे. फेरीवाल्यांना भाजीपाला विक्रीस परवानगी आहे. मात्र त्यांना एका ठिकाणी थांबून विक्री करण्यास प्रतिबंध आहे. – ऍड सुरेंद्र खर्डे ( माजी सरपंच कोल्हार बु ग्रा.पं )