झिप… झॅप… झूम… 7 तासांत मुंबईहून गोवा, वंदे भारत धावणार कोकण रेल्वे मार्गावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण रेल्वेमार्गावरून प्रवास करणारे चाकरमानी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘व्हाइट क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘वंदे भारत’ या सेमी हायस्पीड एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी आज या मार्गावर घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 5.53 वाजता निघालेल्या या एक्स्प्रेसने अवघ्या 6 तास 57 मिनिटांत मडगाव अर्थात गोवा गाठले. आणखी काही ट्रायल रन झाल्यानंतर लवकरच या मार्गावर नियमित वंदे भारत धावणार आहे, असे सांगण्यात आले.

16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस पहाटे 5 वाजून 53 मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना झाली. अवघ्या 6 तास 57 मिनिटांत ही एक्स्प्रेस मडगावला दाखल झाली. त्यानंतर 1 वाजून 13 मिनिटांनी एक्स्प्रेसने परतीचा प्रवास सुरू केला आणि ती मुंबईत पोहचली.

तेजस आणि जनशताब्दी या एक्स्प्रेस गाडय़ा कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावतात. या गाडय़ांना मुंबई ते गोवा अंतर कापण्यास साधारण 8 ते 9 तास लागतात. वंदे भारत हेच अंतर साधारण सात तासांत कापेल. त्यामुळे प्रवासाचा किमान एक तास वाचणार असून सुपरफास्ट वेगाने कोकण आणि गोवा गाठता येणार आहे.

प्रवाशांची पाठ

एकीकडे नव्या मार्गांवर वंदे भारत सुरू करण्याचा धडाका लावण्यात आला असताना विलासपूर-नागपूर मार्गावरील वंदे भारत मात्र बंद करून त्याऐवजी तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर वंदे भारतला सर्वात कमी प्रतिसाद मिळत होता. अर्धी एक्स्प्रेस रिकामीच धावत होती. 50 टक्केच आरक्षण होत होते. त्यामुळे तूर्त वंदे भारतला या मार्गावर ब्रेक लावला गेला आहे. कोकण रेल्वे मार्गावरही महागडय़ा तिकिटामुळे कोकणवासीयांनी तिच्याकडे पाठ फिरवली तर? अशी शंका व्यक्त होत आहे.

कुडाळ मुंबईहून गांधीनगर, साईनगर शिर्डी आणि सोलापूर या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. त्यात लवकरच कोकण रेल्वे मार्गाची भर पडणार आहे. 2023 च्या अखेरपर्यंत 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे.