
सामना प्रतिनिधी। कुडाळ
कुडाळ तालुक्याला गुरूवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. माणगांव खो-यातील आंबेरी पुलावर पाणी जमा झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच कुडाळ शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी रस्त्यावर सखल भागात पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले.
कुडाळ तालुक्यात गेले तीन दिवस पावसाचा जोर कायम असून गुरूवारी दिवसभर तालुक्याला पावसाने झोडपले. यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असून तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. माणगांव खो-यातही बुधवार पासून संततधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्याचे वृत्त आहे.

दरम्यान,कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यालगतचा जुनाट वटवृक्ष गुरूवारी सायंकाळी उन्मळून पडला. हमरस्यालगतचा हा वृक्ष गटाराच्या बाजूने खाली कोसळल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यालगत जुन्या सीईओंच्या बंगल्याजवळ हा जुनाट वटवृक्ष होता. गुरूवारी पावसात वा-याने हा वटवृक्ष उन्मळून पडला. येथील रस्त्यावर रोजच वाहने व नागरिकांची रहदारी असते. मात्र गटाराच्या बाजूने हा वृक्ष खाली कोसळल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. येथील चिरेबंदी गडगा कोसळून नुकसान झाले. तसेच वीज वाहीनीही तुटली आहे.

























































