
सामना प्रतिनिधी । पुणे
उत्तर प्रदेशातील गोंडा या शहरात रविवारी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लांनी मर्दुमकी गाजवून सहा पदकांची कमाई केली. मात्र, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बेजबाबदार आणि गलथान कारभारामुळे महाराष्ट्राच्या संघातील पुरुष व महिला कुस्तीपटूंना रेल्वेत शौचालयाशेजारी व दारात बसून परतीचा प्रवास करावा लागला. ऐन थंडीच्या दिवसांत या प्रवासामध्ये कुस्तीपटूंचे प्रचंड हाल झाले, तर महिला कुस्तीपटूंची कुचंबणा झाली. मात्र, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद नावाचा सुस्तावलेला अजगर कधी जागा होणार, हाच लाखमोलाचा प्रश्न आहे.
वाराणसीत खेळाडूंच्या बॅगा फेकल्या
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख (सुवर्ण), अभिजित कटके (रौप्य), पंकज पवार (रौप्य), सुरेश कोकाटे (कांस्य), अंकिता गुंड (कांस्य), कोमल गोळे (कांस्य) या मराठमोळय़ा मल्लांनी महाराष्ट्राला पदके जिंकून दिली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे 20 पुरुष व 10 महिला मल्लांचे पथक सहभागी झाले होते. रविवारी सायंकाळी 3.30 वाजता रिझर्वेशन कन्फर्म नसलेल्या रेल्वेने या खेळाडूंचा परतीचा प्रवास सुरू झाला. वाराणसीमध्ये रेल्वे आल्यानंतर रिझर्व्हेशन केलेल्या प्रवाशांनी या कुस्तीपटूंच्या बॅगा आपल्या जागेवरून उचलून फेकल्या. काही खेळाडूंना धक्काबुक्कीही सहन करावी लागली. रेल्वेमध्ये गर्दी वाढू लागल्यामुळे या कुस्तीपटूंना शौचालयाजवळ, दारात आणि मिळेल तेथे बसून किंवा कधी उभे राहून प्रवास करावा लागला. मनमाडमध्ये तर या रेल्वेतील गर्दी आणखी वाढली. त्यामुळे नाईलाजाने महाराष्ट्राच्या सर्व कुस्तीपटूंना मनमाड स्टेशनवर उतरावे लागले. मग ट्रव्हल्समध्ये बसून हे खेळाडू पुढे मार्गस्थ झाले.
संघ व्यवस्थापनाचा गलथान कारभार
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची तारीख अशी अचानक नक्कीच जाहीर होत नाही. स्पर्धेचे वेळापत्रक समजल्यानंतर वेळेतच रिझर्व्हेशन केले असते तर खेळाडूंचे असे हाल झाले नसते. समजा रिझर्व्हेशन मिळाले नाहा, ही अडचण गृहीत धरली, तरी संघ व्यवस्थापनाने स्पेशल गाडी करून खेळाडूंना आणले असते तर किती खर्च वाढला असता? महाराष्ट्रातील सर्वांत वजनदार राजकीय नेते असलेले शरद पवार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. असे असताना महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंचे प्रवासात प्रचंड हाल होणे याहून दुर्दैव ते काय!
स्पर्धेला जाताना कुस्तीपटूंचे व्यवस्थित रिझर्व्हेशन केले होते. येताना रिझर्व्हेशन कन्फर्म होऊ न शकल्याने खेळाडूंना परतीच्या प्रवासात थोडा त्रास झाला. आपल्या खेळाडूंचे हाल व्हावेत असे कुणाला वाटेल काय? आम्ही मुद्दाम नक्कीच असे केलेले नाही. वेळेत रिझर्व्हेशन न झाल्याने कुस्तीपटूंना अडचणीला सामोरे जावे लागले. आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत.
– बाळासाहेब लांडगे (सचिव, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद)

























































