
सामना प्रतिनिधी, शिरोळ
शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे धुतलेले कपडे तारेवर वाळत घालत असताना विजेच्या धक्क्याने कस्तुरी सदाशिव पुजारी (वय 45)या महिलेचा दुर्दैवी अंत झाला. दरम्यान मंगराया देवस्थानचे पुजारी सदाशिव पुजारी यांच्या पत्नी कस्तुरी पूजारी आणि त्याची सून रेणुका महादेव पुजारी(वय 20) या दोघी कपडे वाळत घालत असताना तारेत उतरलेल्या विजेचा शॉक लागून तडफडत होत्या. त्यावेळी समोरच शेतात काम करत असलेल्या आनंदा गुरुपाद पुजारीच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याने घराचा विजेचा मुख्य स्विच बंद करून विद्युत पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण घरामध्ये विजेचा शॉक उतरल्याने लगतच पडलेल्या काठीने रेणुका पुजारीच्या हातावर मारून जीव वाचविला तर कस्तुरी पुजारीचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.
रेणुका पुजारी यांच्यावर जयसिंगपूर येथील संजीवनी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आज शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता सुमारास कस्तुरी पुजारी त्याची सून रेणुका पुजारी या दोघी कपडे धुऊन तारेवर वाळत घालत असताना गोट्याच्या छताच्या अँगल पासून ते घरासमोरील झाडाला कपडे वाळत घालण्यासाठी तार बांधण्यात आली आहे गोठ्यात लावलेल्या बल्बची वायर शॉर्ट होऊन गोठ्यासह संपूर्ण घरात वीज उतरली होती.आणि या तारेत ही शॉर्ट उतरल्याने धुतलेले कपडे तारेवर घातल्यानंतर कस्तुरी पुजारी आणि रेणुका पुजारी यांना शॉक लागला यामध्ये आनंदा पुजारी यांच्या प्रयत्नातून रेणुका पुजारी ही बचावली तर कस्तुरी पुजारी याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
या घटनेची वार्ता तेरवाड परिसरात पसरताच माजी उपसरपंच शाबगोंडा पाटील, ग्रा प सदस्य मधुकर कांबळे, राजू माळी,सत्ताप्पा बत्ते सहा आदींनी घटनास्थळी धाव घेऊन. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलवून घेत विद्युत पुरवठा खंडित केला. या घटनेने तेरवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
























































