काळाचौकीत पुन्हा जमीन खचली, आठवडय़ातील दुसरी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत जमीन खचण्याचे सत्र सुरूच असून काळाचौकीच्या वेस्टर्न इंडिया मिल चाळीत जमीन खचल्याची घटना घडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी १५ ते २० फुटांचा खड्डा पडल्याने रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. काळाचौकी परिसरातील आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

काळाचौकी परिसरात पालिकेकडून ड्रेनेज लाइनचे काम सुरू आहे. यासाठी मशीनच्या सहाय्याने खड्डे खोदले जात असल्यामुळे घरांना हादरे बसत असल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच अशा घटना होत असल्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ात अभ्युदय नगर येथे जमीन खचल्याने चारजण अडकले होते तर आठवडाभरापूर्वी वडाळ्यात जमीन खचल्याने तब्बल १५ वाहने गाडली गेली होती. अशा घटना वारंवार घडत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.