
लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उत्तरप्रदेशातून एकाला अटक केली. लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून यापूर्वी एटीएसने पुण्यातील दापोडी आणि कश्मिरमधून दोघांना अटक केली होती.
इनामूल हक (रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. लष्कर-ए-तोएबाशी संबंध असल्याच्या संशयावरून जुनैद मोहम्मद (वय 28, सध्या रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि साथीदार आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (वय 28, रा. किश्तवाड, जम्मू-कश्मीर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आठ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. संशयित जुनैद, आफताब यांची चौकशी करण्यात आली. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसला इनामूल हक लष्कर-ए-तोएबाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने उत्तर प्रदेशातून इनामूल हक याला अटक केली आहे.

























































