
जगविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या महानिर्वाणाने संपूर्ण हिंदुस्थान शोकसागरात बुडाला आहे. लतादीदींची प्रकृती चिंताजनक बनल्यापासून अस्वस्थ झालेल्या देशवासीयांना रविवारी दीदी गेल्याची बातमी धडकताच मोठा धक्का बसला. मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर लतादीदींना श्रद्धांजली वाहणारे फलक जागोजागी झळकले. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत असंख्य चाहत्यांनी सोशल मीडियात आपल्या भावना व्यक्त केल्या. देशभर शोकाकुल वातावरण असून केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारांनी राजकीय दुखवटा जाहीर केल्यामुळे दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले गेले आहेत.
लता मंगेशकर यांची बहरलेली कारकीर्द आणि तब्बल 58 वर्षांचा सहवास पेडर रोडवरील प्रभूकुंजने अनुभवला. 1963पासून आयुष्याचा खरा सोबती ठरलेल्या प्रभूकुंजचा लतादीदींनी 8 जानेवारी रोजी घेतलेला निरोप अखेरचाच ठरला. स्वर’ मागे ठेवून ‘लता’ गेल्याचे वृत्त येताच प्रभूकुंजही सुने सुने झाले.
लाडक्या दीदीला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांचा ओघ प्रभूकुंजच्या दिशेने सुरू झाला. त्यांचा सहवास लाभलेल्या प्रभूकुंज वासीयांसाठी हा धक्काच होता. वृत्त वाहिन्यांवर झळकलेल्या बातम्यांचे क्लिपिंग मोबाईलवर फिरू लागले तसे प्रभूकुंजच्या परिसरात होणारी गर्दीही वाढू लागली. लता दीदींना कधी प्रभूकुंजवर आणले जाणार याचीच वाट प्रत्येकजण पाहत होता. राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील वृत्त वाहिन्यांचे कॅमेरे आणि प्रतिनिधीही प्रभूकुंजवर धडकले होते. मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.‘दुपारी साडेतीनच्या सुमारास लतादीदींची अंत्यायात्रा निघाली तेव्हा चाहत्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. लतादीदींच्या गीतमय आठवणींनी गहिवरलेले मन आणि साश्रूपूर्ण नयनांनी चाहत्यांनी लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप दिला.
पोलिसांसह तिन्ही सैन्य दलांची सलामी
पोलीस दलासह लष्कर, नौदल, हवाई दलाचे अधिकारी आणि सैनिकही प्रभूकुंज परिसरात दाखल झाले. लतादीदींना मानवंदना देतानाच त्यांचे पार्थीव तिरंगी ध्वजात लपेटण्यात आले. पोलीसांसह तिन्ही दलाच्या सैनिकांनी प्रभूकुंज येथे सशस्त्र सलामी दिली. मार्ंचग करीत लष्करी अधिकार्यांनी लतादीदींचे पार्थिव अंत्यात्रेच्या रथावर ठेवले त्यावेळी ‘जब तक सूरज चांद रहेगा, लता मंगेकर नाम रहेगा’ असा एकच आवाज चाहत्यांतून घुमला.
शिवसैनिकांची पुष्पांजली
लता मंगेशकर यांच्यासाठी लष्कराकडून अंत्ययात्रा रथ आणताच तो शिवसैनिकांनी ताब्यात घेतला. पांढर्याशुभ्र फुलांनी शिवसैनिकांनी हा रथ सजवला. विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. रथाच्या पुढील बाजूस लतादीदींची भव्य तसबीर आणि त्यांच्या आवडीच्या पांढऱ्याशुभ्र फुलांतून शिवसैनिकांनी लतादीदींना पुष्पांजली वाहिली.
लतादीदींच्या जन्मभूमीत दु:खाचे सावट
गानकोकीळा लता मंगेशकर यांची जन्मभूमी असलेल्या इंदोरमध्येही दुःखाचे सावट पसरले आहे. लतादीदींचा जन्म इंदोरच्या शीख मोहल्ले येथे झाला होता. त्यामुळे अनेक चाहत्यांनी लतादीदींच्या या जन्मस्थळी पोहोचून त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. या ठिकाणी लतादीदींना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून लतादीदींची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत वेळीच सुधारणा व्हावी, यासाठी इंदोरमधील नागरिकही प्रार्थना, पूजाअर्चा करीत होते. रविवारी लतादीदींच्या जाण्याने जन्मभूमीत शोककळा पसरली. परिसरातील अनेक चाहत्यांनी एकत्र जमून शोकसभेचे आयोजन केले होते. या ठिकाणी लतादीदींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
























































