लातूर – उसाच्या शेतात गांजाची लागवड, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदगीर तालुक्यातील मौजे डोंग्रज येथे उसाच्या शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आली होती. पोलीस पथकाने धाड टाकून दहा लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर तालुक्यातील मौजे डोंग्रज येथे दशरथ रामचंद्र कांबळे याने त्याचे मालकीचे ऊसाचे शेतीमध्ये बेकायदेशीररित्या गांजाची झाडाची लागवड केली आहे, अशी माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन,उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांचे नेतृत्वात पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण येथील अधिकारी व अंमलदार यांनी मौजे डोंग्रज येथील दशरथ रामचंद्र कांबळे याचे ऊसाचे शेतामध्ये जाऊन छापा मारला.

त्याचे उसाच्या शेतीमध्ये बेकायदेशीररित्या गांजाची 44 झाडे लावलेली मिळून आली. सदर गांजाचे झाडांची घटनास्थळीच दोन शासकीय पंचांसमक्ष पंचनामा करून वजन केले असता त्याचे वजन 109 किलो व किंमत अंदाजे 10,01,619 रुपये इतकी असून सदरचा मुद्देमाल हा ताब्यात घेतला आहे.

दशरथ रामचंद्र कांबळे (47, राहणार डोंग्रज तालुका चाकूर) यास ताब्यात घेतले आहे. पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक क 646/2022, कलम 08, 20, 22 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे हे करीत आहेत.

ही कार्यवाही पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे,पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे, तानाजी चेरले,पोलीस अमलदार रमेश कांबळे, राम बनसोडे , सखाराम भिसे, सिद्धेश्वर स्वामी, कृष्णा पवार, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, नामदेव चेरले, शिवदास बोईनवाड, गंगाधर साखरे, नजीर शेख यांनी केली आहे.