सिनेट सदस्याची नियुक्ती नियमबाह्य, युवासेनेचे चौकशीची मागणी

93

सामना प्रतिनिधी । लातूर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंनी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियमबाह्यपणे व चुकीची कार्यपध्दतीने अवलंबून नगरसेवकाची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीची चौकशी विद्यापीठाच्या बाहेरच्या तज्ञ व्यक्तीकडून करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेचे सहसचिव तथा सिनेट सदस्य प्रा. सुरज दामरे यांनी केली आहे.

19 जुलै रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंनी उदगीर नगरपालिकेतील सदस्याची एक वर्षासाठी सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेली आहे. कुलगुरुंनी आपल्या विशेष अधिकाराचा गैरवापर केल्याची शंका दिसून येत आहे. सदर निवड करताना नगरपालिकेतील इतर उमेदवारही पात्र असताना तसेच नगरपालिकेकडून कोणताही प्रस्ताव न मागवता ही निवड केल्याचे दिसून येत आहे. अशी तक्रार युवासेनेने केली आहे.

या निवडीमागे कुलगुरुंनी आपले नातेसंबंध, राजकीय हितसंबंध जोपासण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. यामुळे जनमानसांत चुकीचा संदेश जात असून विद्यापीठ प्रशासनावर असलेल्या विद्यार्थी व जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. याची तत्काळ दखल घेऊन विद्यापीठाच्या कक्षेच्या बाहेरच्या तज्ञाकडून या नियुक्तीची चौकशी करावी अन्यथा या निवडीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रा. सुरज दामरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या