जळकोट – मालट्रक व मोटारसायकलच्या अपघातात तरुण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधारात रोडवर थांबलेला मालट्रक व मोटारसायकल यांची जबरदस्त टक्कर होऊन शिरुर ताजबंद – मुखेड राज्य महामार्गावर उमरगा रेतू पाटी (ता. जळकोट) जवळ बालाजी अंकुश कळिंग्रे (रा. हडोळती) हा तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र हडोळती येथे शवविच्छेदन करुन या मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींकडून समजलेल्या माहितीनुसार उमरगा रेतू पाटीजवळ एक मालट्रक उभा होता. रात्रीची वेळ असल्याने अंधारात उभ्या असलेल्या गाडीचा अंदाज न आल्याने पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलची व मालट्रकची जोराची धडक बसली. त्यात बालाजी कळिंग्रे यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना 21 जुलै रोजी मध्यरात्री घडल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जळकोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अहमदपूर पोलीस ठाण्याकडून कागदपत्रे आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती जळकोटचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिली.