लातूर- प्रेमप्रकरणात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकाचा निर्घृणपणे खून

मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला. या खून प्रकरणी लातूर येथे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयत युवकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात शिवाजी शाहू कापसे (रा. चिकुर्डा) यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, रात्री साडे दहा वाजता त्यांचा मुलगा अशोक हा त्याचा मित्र मोहिम बावणे याच्या घरी झोपण्यासाठी जात आहे, असे सांगून घरून गेला.

रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अशोक व त्याचा मित्र मोहित बावणे हे दोघेजण अजय पिसाळ (रा. विक्रम नगर) यास भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. मोहित बावणे व अजय पिसाळ यांच्यात मुलीच्या प्रेमप्रकरणातून झालेल्या भांडणाच्या कारणावरुन झटापट होऊ लागली.

तेव्हा अशोक हा भांडण सोडवत असताना अजय पिसाळ याचा भाऊ विजय हा हातात चाकू घेऊन आला व त्याने चाकुने अशोक व मोहित यांच्यावर वार केले. अशोक याच्या गळ्यावर चाकूचा वार केल्याने गळा कापला गेला.

मोहित बावणे याच्या पाठीत, मांडीवर चाकुचे वार करण्यात आले. यात तो गंभीर जखमी झाला. लातूर येथील शासकीय रुग्णालयात अशोकला घेऊन जाण्यात आले, तेव्हा त्याला तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदरील खून प्रकरणी विजय दिनकर पिसाळ व अजय दिनकर पिसाळ या दोघा भावांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या