
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार गुजरातचे चाकरच बनले आहे. महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातच्या पदरी टाकल्यानंतर आता येथे राहणार्या गुजराती कर्मचार्यांना 1आणि 5 डिसेंबर रोजी होणार्या मतदानासाठी भरपगारी सुटी शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केली आहे. यासाठी खास आदेश जारी करण्यात आला असून, तो खासगी व शासकीय संस्थांना लागू असणार आहे.
गुजरात विधानसभेसाठी 1 व 5 डिसेंबर असे दोन टप्प्यात मतदान होणार आहे. गुजरातेत काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या झंझावाताला टक्कर देता देता भाजपच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे गुजरात भाजपच्या मदतीला शिंदे-फडणवीस सरकार धावून गेले आहे. राज्यात पालघर, नाशिक, नंदूरबार तसेच धुळ्यासह पुणे, मुंबई येथेही मोठ्या प्रमाणावर गुजराती नागरिक नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य करून आहेत. हे नागरिक महाराष्ट्रात राहत असले तरी त्यांची नावे गुजरातेतील मतदार यादीत आहेत. त्यामुळे त्यांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, तसा शासन आदेशही काढण्यात आला आहे.
उद्योग, ऊर्जा तसेच कामगार विभागाने हा आदेश जारी केला असून, तो खासगी तसेच शासकीय संस्थांना लागू असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकार्यांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल. मतदारांना मतदानासाठी सुटी न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.



























































