
>>मृणाल घनकुटे
हल्ली त्वचेच्या उपचारांसाठी एलईडी थेरेपीचा वापर केला जातोय. अॅकने स्कार्स, सुरकुत्या, सनबर्न आदी त्वचेच्या समस्यांवरील उपचारासाठी फायदेशीर आहे.
अलीकडेच लोकांनी त्वचेच्या उपचारांसाठी एलईडी थेरेपी वापरण्यास सुरुवात केली आहे. एलईडी किरणे त्वचेच्या जखमांवर उपचार करतात आणि मानवी उतींची वाढ करतात. एलईडी लाइट थेरेपीचा उपयोग सनबर्न, पिंपल्स, स्कार्स किंवा जखमा अशा त्वचा समस्यांसाठी केला जातो. ही उपचार पद्धती त्वचेच्या नैसर्गिक प्रक्रियेस चालना देण्यासाठी आणि त्वचेची दुरुस्ती करण्यासाठी वापरली जाते. या कॉस्मेटिक उपचारांबद्दल आम्ही बोईसर येथील त्वचातज्ञ डॉ. हेमांगी राऊत यांच्याकडून जाणून घेतले.
डॉ. हेमांगी सांगतात, त्वचेसाठी एलईडी लाइट थेरपी जखमेच्या उपचारांसाठी आणि त्वचेच्या इतर प्रकारच्या नुकसानासाठी प्रभावी असू शकते. भूतकाळात, नेव्ही सीलने जखमा भरून काढण्यासाठी एलईडी लाइट थेरपीचा वापर केला होता. या उपचारामुळे टीम सदस्यांमधील मस्कुलोस्केलेटल जखमांमध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त सुधारणा झाली. त्यामुळे जखमा भरण्यासाठी लागणारा वेळही कमी झाला. मुरुमे असलेल्या बहुतेक लोकांना एलईडी लाइट थेरपी वापरून त्यांच्या लक्षणांमध्ये सुधारणा दिसून येईल, परंतु त्यांनी सर्व मुरुमे नाहीशी होण्याची अपेक्षा करू नये, असेही डॉ. हेमांगी सांगतात.
ही थेरपी कशी वापरावी?
चेहरा, हात, मान आणि छातीसह शरीराच्या कोणत्याही भागावर वापरण्यासाठी ही थेरेपी उपयुक्त आहे. उपचारादरम्यान, संबंधित व्यक्तीला एलईडी लाइटखाली झोपवून त्वचेवर प्रक्रिया केली जाते. उत्तम प्रभावासाठी कमीत कमी दहा सत्रे आवश्यक आहेत.
रेड लाइट
लाल प्रकाश डाग सुधारण्यास तसेच सुरकुत्या यांसारख्या वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास मदत करतो. आपले शरीर कोलेजन नावाचे प्रोटीन तयार करते, जे त्वचेच्या संरचनेत आणि कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्यक्तीचे वय वाढते, तसतसे शरीरात कोलेजन कमी तयार होते, ज्यामुळे त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. रेड लाइटमुळे त्वचेची जळजळ कमी होते. रेड लाइट आपल्या त्वचेतील फायब्रोब्लास्ट्सशी (fibroblast cells) संवाद साधून कोलेजन उत्पादनासाठी मदत करतात.
ब्लू लाइट
ब्लू लाइट सीबेसियस ग्लैंड्स (Sebaceous glands) ची क्रिया कमी करण्यास मदत करतो. सीबेसियस ग्लैंड्स म्हणजे त्वचेच्या लहान तेल उत्पादक ग्रंथी असतात. या उपचारामुळे ग्रंथी कमी तेल तयार करतात आणि मुरुमांची लक्षणे सुधारण्यास मदत करतात. निळा प्रकाश एक प्रकारचे जिवाणू जे सूज निर्माण करून पुरळ होण्यास हातभार लावतात, त्यांना मारण्यासदेखील मदत करू शकतो. एनसीबीआय ऑनिमल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की, निळा प्रकाश थर्ड डिग्री बर्न्सचे निराकरण करण्यात मदत करू शकतो.
थेरेपीचे फायदे
त्वचेसाठी एलईडी लाइट थेरपी वापरण्यास सुरक्षित आहे. एनसीबीआयच्या संशोधनानुसार, त्यात त्वचेसाठी हानिकारक अतिनील किरण नसतात. म्हणूनच ते नियमित वापरासाठी सुरक्षित आहे. ही थेरेपी मुरुम, त्वचारोग, निस्तेज त्वचा, एक्जिमा, सोरायसिस, अॅकने स्कार्स, सुरकुत्या, सनबर्न आदी त्वचेच्या समस्यांवरील उपचारासाठी फायदेशीर आहे.
























































