विधान परिषदेवर कुणाची वर्णी लागणार? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 8 जागांवर 13 जणांची फिल्डिंग

कोरोनाच्या संकटामुळे मागील चार महिन्यांपासून रखडलेल्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त बारा जागांवर वर्णी लावण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला येणाऱया आठ जागांसाठी किमान तेरा जण स्पर्धेत आहे. या इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या जागा गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहेत. कोरोनाचे संकटामुळे व इच्छुकाच्या संख्येत दिवसेदिवस पडणारी भर यामुळे या नियुक्त्या रखडल्या होत्या. मागच्या आठवडय़ात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियुक्तीचा प्रस्ताव चर्चेला येणार होता. पण काही कारणाने हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला असे सांगण्यात येते. आता उद्या दुपारी एक वाजता होणाऱया मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशीही चर्चा आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला प्रत्येकी चार जागा मिळणार आहे. त्यामुळे विधान परिषदेवर कोणत्या पक्षातून कोणाची नियुक्ती होणार याबाबत अनेक राजकीय नेत्यांची नावे चर्चेत आहेत. मात्र सर्वांचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाकडे लागले आहे.

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर आता भाजपला शह देण्यासाठी एकनाथ खडसे यांना विधान परिषदेवर आणणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाचीही दोन दिवसांपासून चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून पराभव पत्करावा लागल्यानंतर आता उर्मिला मातोंडकर यांची काँग्रेसच्या कोटय़ातून विधान परिषदेवर वर्णी लागणार असे सांगण्यात येते.

काँग्रेसमधून सचिन सावंत यांच्यापासून मोहन जोशी, सत्यजित तांबे, रजनी पाटील, नमीस खान, मुझफ्फर हुसेन यांची नावे चालवण्यात येत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवाजी गर्जे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे, उत्तमराव जानकर यांची नावे पुढे करण्यात येत आहे. मात्र या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या