पुस्तकं वाचकांविना सुनी!!

कोरोना व्हायरसमुळे वाचनालयं, ग्रंथालयावरही परिणाम झाला आहे. ग्रंथालयं, वाचनालयं अजूनही बंद आहेतपुस्तकांची काही दुकानं काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली आहेत. बंद असलेल्या ग्रंथालयामुळे वाचकांची वाचनाची आवड जोपासली जात नाही. पुस्तकं देवाणघेवाणीतून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो या भीतीपोटी ग्रंथालये बंद आहेत. वाचकांची आवड आणि गरज लक्षात घेऊन ग्रंथपाल, पुस्तक विक्रेते आणि पुस्तकं घरी घेऊन येणारे ग्रंथालय सहायक यांच्याकडून कोरोनामुळे पुस्तक प्रकाशन, विक्री, वितरण या सर्वांवरच सध्या काय परिणाम होत आहे याविषयी जाणून घेऊया 

कोरोनाचा प्रभाव आई सरस्वतीच्या दालनावरही झाला आहे. ग्रंथालये बंद आहेत. सुरू असली तरी पुस्तकप्रेमी येण्यास धजावत नाहीत. पुस्तकविश्वाचा कोरोना काळातील संघर्ष…

दिवाळी अंकाची तयारी सुरू

दादर शिवाजी मंदिरमधलं आमचं दुकान ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालं तर गिरगाव, ठाणे येथील दुकानाला जून महिन्यात सुरू करण्याची परवानगी मिळाली. तापमान तपासणे, मास्क-सॅनिटायझर वापरणे, दुकान सॅनिटाइझ करणे हे सर्व नियम आम्ही पाळतो. सोशल डिस्टन्सिंगही पाळतो. लोकांचं दुकानात येण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. एकावेळी पाच माणसांना आम्ही दुकानात येण्याची परवानगी देतो. मार्च महिन्यात जी पुस्तकं प्रकाशित होणार होती ती लॉकडाऊननंतर प्रकाशित झाली. पुस्तकं प्रकाशित होण्याचं प्रमाण कमी आहे. दिवाळी अंक या वर्षीसुद्धा येणार आहेत. मोठे अंक सगळेच असतील. मॅजेस्टिकच्याही दिवाळी अंकाचं काम सुरू झालंय. –अक्षय कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन

नियम पाळून ग्रंथ वितरण करू

मार्च महिन्यात जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासूनच ग्रंथालय बंद आहे. मी ग्रंथालयातून सोसायटी, ऑफिसमध्ये वाचकांना पुस्तकं देण्यासाठी जातो. कोरोना काळात घरी, सोसायटय़ांमध्ये पुस्तकं घेऊन जाणं शक्यच नव्हतं. लोक आता सतत ग्रंथालय कधी सुरू होणार विचारू लागली आहेत. त्यामुळे सामाजिक अंतरही राखता येईल. – हर्षद चौलकर, माहीम सार्वजनिक वाचनालय

वाचकांची गरज

आताच्या काळात पुस्तक वाचनाची खरंच गरज आहे. सतत बातम्या बघितल्यानेही कंटाळा येतो. मात्र शासनाचा निर्णय असल्यामुळे आम्ही ते सुरू करू शकत नाही. सुरुवातीला आम्ही ग्रंथालयातर्फे काही ऑनलाइन उपक्रम राबवले, पण सुरुवातीला ते फॅड होतं. नंतर त्यालाही लोक कंटाळले. आजही लोक सारखं फोन करून विचारत आहेत. जर कोरोना काळात ग्रंथालय सुरू केलं तर आम्ही नियोजन करू. वाचकांना हवं असलेलं पुस्तकं आधीच काढून ठेवू. म्हणजे गर्दी होणार नाही. महिन्याची चार पुस्तकं एकदाच देऊ. घरी नेऊन पुस्तकं देण्याच्या सुविधेतही काही बदल करू. कोरोनाचे नियम पाळून वाचकांपर्यंत पुस्तकं कशी पोहोचतील याची काळजी घेऊ. एका महिन्याला चार पुस्तकं एकाच वेळी वाचकांना दिली की, त्यांचा आणि आमचा संपर्क महिनाभरानंतरच येईल.तसेच वाचनालयात येणारे वाचक किंवा इतर पुस्तकं घेऊन जाण्याकरिता येणारा ग्राहक या सगळ्यांकरिता सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर हे नियम आम्ही पाळूच. शिवाय ग्रंथालयात आमचा सहा जणांचा स्टाफ आहे. आम्ही तीन-तीन जण एक दिवसआड येऊ. त्यामुळे आर्थिक व्यवहार सुरू राहील असे वाटते.- संदीप पेडणेकर, दादर-माहीम सार्वजनिक वाचनालय

आपली प्रतिक्रिया द्या