
काजळ लावल्यानंतर थोड्याच वेळात ते पसरतं आणि मग डोळ्यांखाली सगळंच काळं-काळं दिसू लागतं. म्हणून मग आपण जास्तीचे पैसे खर्च करून महागडं काजळ खरेदी करतो, पण तरीही जे व्हायचं तेच होतं. फार तर काय की, ते जास्त वेळाने पसरतं हाच महागड्या काजळात फरक असू शकतो. असं झालं की, मग पैसे उगाच वाया घालवल्याचा दोष आपण स्वत:लाच देत बसतो.
म्हणूनच तर काजळ लावण्यासाठी या 5 अतिशय सोप्या ट्रिक्स वापरून पहा. उन्हाळ्यात खूप घाम येतो त्यामुळे काजळ पसरतं. पावसाळ्यातही पावसामुळे किंवा दमट हवामानामुळे ही समस्या जाणवते. म्हणूनच हा त्रास कमी करण्यासाठी या सोप्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात.
- काजळ लावण्याआधी डोळ्यांच्या खालच्या भागाला बर्फ लावून काही सेकंद मसाज करा. यासाठी एका रुमालामध्ये बर्फाचा तुकडा टाका. आणि अलगद त्याने खालच्या पापण्यांच्या खाली असणाऱ्या भागावर दाब द्या. खूप जोरजोरात दाबू नका. बर्फ नसेल तर रुमाल किंवा टिश्यू पेपर थंड पाण्यात बुडवा. तो पिळून घ्या आणि नंतर त्याने डोळ्यांखाली मसाज करा. यामुळे डोळ्यांच्या भागात येणारा तेलकटपणा कंट्रोल केला जाईल.
- यानंतर दुसरी स्टेप म्हणजे डोळ्याच्या आजूबाजूला लॅक्टोकॅलामाईन, बीबी क्रिम किंवा सीसी क्रिम यांच्यापैकी काहीही लावून काही सेकंदांसाठी हलक्या हाताने मसाज करा. जास्त जोर अजिबात देऊ नका. यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूचा काळेपणा कमी होईल.
- काजळ लावताना आपण डोळ्याच्या खालची त्वचा थोडीशी ओढतो आणि मग काजळ लावतो. असं करणं टाळा. त्वचा अजिबात ओढू नका. फक्त थोडंसं वर बघा आणि तसेच पापण्यांवरून अलगद काजळ पेन्सिल फिरवा. डोळ्याचं जे नाकाजवळचं टोक असतं, तिथून पाणी येतं आणि त्यामुळे काजळ सर्वात जास्त पसरतं. त्यामुळे त्या भागात काजळ लावणं टाळा.
- काजळ लावल्यानंतर त्याच्या खाली अलगदपणे वॉटरफ्रुप आयलायरन लावा. यामुळे काजळ आपोआप आहे त्या ठिकाणी लॉक होऊन जाईल आणि खूप वेळ न पसरता जसंच्या तसंच राहील.
- यानंतर शेवटची स्टेप म्हणजे काजळाच्या खाली हलक्या हाताने रूज पावडर लावा. ते नसेल तर कोणतीही टाल्कम पावडर किंवा बेबी पावडर लावली तरी चालेल.



























































