
फळं खाल्ल्यानंतर साल फेकून दिली जाते, मात्र टाकून दिल्या जाणाऱ्या फळांच्या सालीतही त्वचा तजेलदार करण्याचे गुणधर्म आहेत. चेहऱ्यावर सतत मुरुमं येणे, डाग पडणे, त्वचा कोरडी पडणे यामागील कारणे शोधून त्यावर प्राथमिक स्तरावर घरगुती उपचार करण्यासाठी फळांच्या सालींचा वापर करता येऊ शकतो. फळांचे सेवन तर आपण करतोच. अशा वेळी खाल्लेल्या फळांच्या साली फेकून न देता त्याचा त्वचेचे आरोग्य सुधारण्याकरिता फायदा करून घ्यायला हवा. फळांमध्ये नैसर्गिक पोषक घटकांचा समावेश अधिक असतो. फळांच्या सेवनामुळे वेगवेगळ्या औषधी गुणधर्मांचाही आपल्या त्वचेला लाभ मिळतो. याकरिता जाणून घेऊया फळांच्या सालींनी त्वचा आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढीचे रहस्य !
टोमॅटो
टोमॅटोच्या गोल चकत्या कापून या चकत्या आपण चेहऱ्यावर ठेवू शकता. या टोमॅटोच्या चकत्या चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये फिरवून घ्या. चेहेऱ्यासाठी टोमॅटोचा वापर करणे यापेक्षा काहीही चांगले नाही. साधारण तासाभरात त्वचा हा रस पूर्णपणे शोषून घेईल. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. यामुळे त्वचेला आर्द्रता मिळेल. टोमॅटोमध्ये सायट्रिक अॅसिड आणि मॅलिक अॅसिड असते. हे दोन्ही घटक मृत त्वचेचा थर काढून टाकण्यासाठी मदत करतात. यामुळे चेहरा तजेलदार आणि तुकतुकीत होण्यासाठी मदत होते.
बटाटा
बटाट्यामध्ये कित्येक नैसर्गिक गुणधर्मांचा समावेश आहे. यामुळे आपली त्वचा सुंदर, नितळ आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. त्वचा टॅन होणे ही आजकाल एक सामान्य समस्या आहे. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बटाट्याचा वापर. डोळ्यांखालील काळे डागही कच्च्या बटाटयाच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्याने निघून जायला मदत होऊ शकते. बटाट्याच्या चकत्या संपूर्ण चेहेऱ्यावर फिरवल्यास टॅनिंग झालेली त्वचा उजळण्यास फायदेशीर ठरते.
नारळाचा किस
नारळामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. यामुळे त्वचेला मॉइश्चरायझिंग मिळते. नारळामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. जे सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करते. नारळ खवून त्याचा बारीक किस करावा. त्यानंतर हा खवलेला नारळ मिक्सरमधून बारीक करावा. त्यात थोडेसे पाणी घाला. मिक्सरमधील हे मिश्रण एका स्वच्छ सुती कापडात गाळून घ्या. नारळातून निघालेले दूध बाजूला ठेवून त्यातील जो चोथा उरला आहे तो चेहऱ्याला लावा. असे केल्यास नारळातील पोषक तत्त्वे आपल्या त्वचेला मिळतात. यामुळे त्वचा फ्रेश आणि तजेलदार दिसू लागते.
पपईची साल
आहारामध्ये पपईचा समावेश नक्कीच केला जातो. चेहऱ्यासाठी पपई फेस पॅकचाही उपयोग करू शकतो. यासाठी पपईची पातळ पेस्ट करावी आणि चेहऱ्यावर लावावी. याशिवाय पपई खाऊन झाल्यावर त्याची साल संपूर्ण चेहऱ्यावर लावावी. यामुळे पपईच्या सालीत असणारे पोषक तत्त्वे त्वचेला मिळतात.
केळ्याची साल
केळ्याच्या सालीचा त्वचेसाठी वापर करताना केळ्याची साल नेहमी ताजी असावी हे लक्षात ठेवा. केळीच्या सालीने चेहऱ्यावर साधारण 20 ते 25 मिनिटे मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब होतील आणि त्वचा उडळ होईल. त्वचेसाठी केळीची साल गुणकारी आहे. केळीची साल चेहऱ्यावर चोळली तर त्वचा चांगली होते. चेहऱ्यावरील मुरमांची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.




























































