चालणे… एक सोपा व्यायाम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  वैद्य सत्यव्रत नानल

आज समाजात सर्वात जास्त माणसे चालण्याचा व्यायाम करतात. यात वजन कमी करणारे लोकही असतात. चालणे हा व्यायाम प्रकार अशाच सोप्या प्रकारांपैकी आहे, जो सातत्याने कोणत्याही वयात करता येऊ शकतो. गरज आहे त्याचे नियम समजून घ्यायची. चला, मग आज चालण्याचे नियम समजून घेऊ या.

कुणी चालावे?

 प्रत्येक स्वस्थ व्यक्ती चालण्याचा व्यायाम करू शकते.
 यक्ष्मा रोग, कुपोषण सोडल्यास कोणत्याही रोगात चालण्यावर बंदी नाही. उलट फायदाच होतो. आयुर्वेदानुसार मधुमेहात चालणे हाच सर्वोत्तम व्यायाम आहे.
कुणी चालू नये?
 ज्यांना चालल्याने कोणतेही दुखणे निर्माण होत असेल, वाढत असेल त्यांनी चालू नये. आधी कारणे शोधावीत. ज्यांना चालल्याने दम लागत असेल तर त्यांनी चालू नये.
 ज्यांचे वजन कमी आहे किंवा काहीही निमित्ताने पटकन कमी होते अशांनी वैद्याचा सल्ला घ्यावा. शक्यतो चालू नये.

का/कशाला चालावे?

चालल्याने संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा सुधारतो. छोटे मोठे रोग, अवस्था पटकन बरे होतात, आटोक्यात येतात. चालल्याने घाम येऊन शरीरातील उष्णता, थंडावा हळूहळू, पण चांगल्या प्रकारे बदलतो. शरीरावरील चरबीचे प्रमाण कमी व्हायला चांगलीच मदत होते. नियमित चालल्यावर रक्तातील उष्णता कमी झाल्याने त्वचा सुधारते. हृदयाची कार्यशक्ती सुधारते. सर्व सांध्यांचा चालण्याने थोडा थोडा व्यायाम होतो, ज्याने त्यांचे आयुष्यही सुधारते.

कधी/केव्हा चालावे?
तसे पाहता दिवसभरात किंवा रात्री कधीही चालता येऊ शकते, परंतु शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चालावे. उन्हात चालायला जाऊ नये. उन्हात चालल्याने डोळ्यांचे रोग होतात. सायंकाळी चालणे योग्य, परंतु पहाटे चालणे कधीही श्रेष्ठ. जेवल्यावर शतपावली इतकाच व्यायाम म्हणून चालावे. तेही गरजेचे असल्यास. शतपावली म्हणजे 100 पावले. जेवल्यावर दोन तास कोणताही व्यायाम करू नये. शतपावली जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने घातली तर चालते. तीही सावकाश. आजकाल

कॉर्पोरेट ऑफिसेसमधले लोक दुपारी जेवल्यावर चालायला जातात, जिने चढताना दिसतात. ते चुकीचे आहे. त्याने हृदयाचे रोग होतात. सांधे लवकर खराब होतात.

किती चालावे?

सामान्यतः चालणे असेल तर रोज किमान अर्धा ते पाऊण तास चालावे. वजन कमी करण्यासाठी रोज किमान 45 मिनिटे चालावे. पहिली 20 मिनिटे चालून शरीरातील फक्त पाणीच हलते. चरबीवर परिणाम त्यापेक्षा जास्त वेळ चालल्याने होतो. रोज किमान दीड तास चालल्याने वजन चांगलेच कमी होते आणि कमी झालेले टिकतेसुद्धा. असे चालताना अति जलद किंवा अति मंद वेगात चालू नये. सामान्यतः आपण रस्त्यावर ज्या वेगाने चालतो त्याच वेगाने रोज सातत्याने चालावे, चालत रहावे. फायदा होतो आणि टिकतोदेखील.

कसे चालावे?

 सामान्यतः रस्त्यावर ज्या वेगाने चालतो त्याच वेगाने चालावे 
 गाणी ऐकत किंवा गप्पा मारत चालू नये. फोनवर बोलू नये.
 चालताना आपल्या श्वासावर लक्ष ठेवावे. दीर्घ श्वसन करतच चालावे. नाकाने लांब श्वास घ्यावा. तोंडाने लांब श्वास सोडावा. याने हृदयाची शक्ती वाढते. हृदयातील अडथळे कमी होतात.
 सामान्य माणूस अंदाजे 15 ते 19 मिनिटांत एक किलोमीटर चालतो. सवयीप्रमाणे प्रत्येकाला एवढाच वेळ लागतो.
 चालणे हा सर्वात सोपा व्यायाम प्रकार आहे, जो कुणीही कुठेही करू शकतो. कोणत्याही ऋतूमध्ये चालणे शक्य असते.

[email protected]