पुरुषांनो, आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश , निरोगी आणि उत्साही राहाल !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुरुष आणि स्त्रियांच्या जडणघडणीत बराच फरक असतो. पुरुषांना स्त्रियांपेक्षा वेगळ्या आहाराची गरज असते. स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या शरीरात स्नायू खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरुषांनी आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराचे पोषण होतेच, शिवाय शरीराला ऊर्जाही मिळते. जाणून घेऊया पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या आहाराविषयी –

बदाम
हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट बदामामध्ये भरपूर प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्व ईचे प्रमाणही बदामामध्ये जास्त असते. बदाम ह्रदय, पचनसंस्था आणि त्वचेसाठी चांगले मानले जाते. पुरुषांनी त्यांच्या नियमित आहारात बदामाचा समावेश करणे आवश्यक आहे.

क्विनोआ
क्विनोआ हे धान्य आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. प्रथिनांसह, क्विनोआमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्सही जास्त प्रमाणात असतात. याशिवाय फायबर आणि जीवनसत्त्व बीचा एक उत्तम स्रोत मानला जातो. आठवड्यातून 2 ते 3 वेळा याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आढळतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. अभ्यासानुसार, असे आढळले आहे की, जेव्हा तुम्ही नियमित रिफाइंड तेलाऐवजी मोनोअनसॅच्युरेटेड ऑलिव्ह ऑइलचे सेवन करता तेव्हा ते हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करते. ऑलिव्ह ऑइलमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात जे वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात. दररोज 2 चमचे ऑलिव्ह ऑइलचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

ग्रीन टी
वजन कमी करण्यासोबतच कॅन्सरशी लढण्यासाठीही ग्रीन टी खूप फायदेशीर मानले जाते. दररोज 1 ते 3 कप ग्रीन टीचे सेवन पुरुषांसाठी फायदेशीर ठरू शकते.

अंडी
पुरुषांनी रोज एक अंडं खाणं आवश्यक आहे. एका अंड्यामध्ये 4 ग्रॅम एमिनो अॅसिड आढळते. स्नायूंच्या उभारणीसाठी अमिनो अॅसिड फायदेशीर मानले जातात. यासोबतच अंड्यातील पिवळ्या भागात कोलीन आढळते. ते मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर आहे. पुरुषांनी आठवड्यातून 3 ते 7 अंडी खाणे आवश्यक आहे.

दूध
दूध शरीरासाठी खूप चांगले मानले जाते. दूध हा कॅल्शियमचा मुख्य स्त्रोत आहे जो हाडे मजबूत ठेवण्याचे काम करतो. दुधामध्ये काही घटक असतात जे शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया सुरू करण्यास आणि चरबीचा संचय कमी करण्यास मदत करतात.

सोया
सोयाबीनमध्ये मांसाप्रमाणे प्रथिने, संपूर्ण धान्याप्रमाणे फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. बाजारात असे अनेक प्रोटीन शेक उपलब्ध आहेत ज्यात सोयाबीन मिसळले जाते, त्यामुळे जर तुम्हाला सोयाबीनचे दूध आवडत नसेल तर तुम्ही त्याचे सेवन करू शकता. हे चवीला फारसे चांगले नसले, तरी पोटासाठी फायदेशीर आहे. पुरुषांनी आठवड्यातून दोनदा सोयाबीनचे सेवन करायला हवे.

दही
दह्याचे दुधासारखेच फायदे आहेत. याशिवाय दह्याचे सेवन केल्याने पोटातील जंतूंशी लढणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते, ज्यामुळे आजारी पडण्यापासून रक्षण होते. जे लोक नियमितपणे दह्याचे सेवन करतात, त्यांची आजारी पडण्याची शक्यताही कमी असते. दुधाप्रमाणेच, दह्यामध्येही कॅल्शियम आढळते, जे शरीरातील फॅट बर्निंग सिस्टीम सुरू करण्यास मदत करतात, दह्यामुळे दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले राहते. वजन कमी करण्यासाठी दही अगदी योग्य मानले जाते. पुरुषांनी दिवसातून 3 वेळा दह्याचे सेवन करावे.

ब्रोकोली
जर तुम्ही प्रौढ असाल तर ब्रोकोली तुमच्या यादीत वरच्या क्रमांकावर असावी. ब्रोकोलीमध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण खूप जास्त असते. पुरुषांनी आठवड्यातून 2 ते 3 अर्धा कप ब्रोकोली खाणे आवश्यक आहे. ब्रोकोली कच्ची, शिजवून किंवा उकडूनही खाऊ शकता.