‘बटाट्याच्या रसा’मध्ये आहे सौंदर्याचे रहस्य, जाणून घ्या त्वचेसाठी त्याचा कसा वापर कराल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपण विविध प्रकारचे घरगुती उपाय करून पाहतो. त्वचेच्या सौंदर्याकरिता बटाट्याचा रस वापरणेही फायदेशीर आहे. प्रत्येक घरांतील स्वयंपाकघरात बटाटा अगदी सहज उपलब्ध होतो. त्वचेची निगा राखण्यासाठी याचा वापर करणे अगदी सोपे आहे. बटाट्याच्या रसाने चेहऱ्याला मसाज केल्यास त्वचेवरील काळे डाग दूर होतात. इतकेच नाही, तर बटाट्याच्या रसात अंड्याचा पांढरा भाग मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची छिद्रे चांगली होतात आणि त्वचा तरुण दिसायला मदत होते. जाणून घेऊया सौंदर्यवाढीसाठी बटाट्याच्या रसाचा वापर कसा करायचा.

त्वचा चमकदार होण्यासाठी

चेहऱ्यावर डाग पडले असतील आणि चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणे दिसत असतील तर अर्धा बटाटा किसून त्याचा रस काढा आणि त्यात दोन चमचे दूध मिसळा. हे मिश्रण कापसाच्या साहाय्याने चेहरा आणि मानेवर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतील आणि चेहरा तरुण दिसेल.

सुरकुत्या काढण्यासाठी

चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील आणि काळे डाग वाढू लागले असतील तर ते निघून जाण्यासाठी बटाटा बारीक करून त्याचा रस दररोज 20 मिनिटे चेहऱ्यावर लावावा. यामुळे सुरकुत्या दूर होतीलच, त्याचबरोबर काळे डागही हलके होऊ लागतील.

वृद्धत्वाची लक्षणे दूर करण्यासाठी

वृद्धत्वाचे लक्षण दूर करण्यासाठी पार्लरमध्ये घेण्यात येणारे उपचार महागडे असतात. त्याऐवजी बटाट्याचा रस दररोज 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. काही दिवसांत तुम्हाला फरक दिसू लागेल.

बटाटा आणि लिंबाचा रस

एका भांड्यात समान प्रमाणात बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये कापसाच्या बोळ्याच्या मदतीने त्वचेवर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेसाठी सर्वोत्तम जीवनसत्त्वांपैकी एक मानले जाते. हा उपाय आठवड्यातून 3 वेळा चेहऱ्यावर करू शकता.

बटाट्याचा रस आणि मुलतानी माती फेस मास्क

मुलतानी माती, बटाट्याच्या रस आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. ते सुकल्यावर चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा वापरा. मुरुमांचा त्रास असेल, तर चिमूटभर हळद घालून त्याचा वापर करू शकता.

टोनर म्हणून बटाट्याचा रस

एक मध्यम आकाराचा बटाटा घ्या आणि त्याचा रस काढा. आता त्यात एक कप पाणी घालून स्प्रे बॉटलमध्ये ठेवा. टोनर म्हणून तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा, परंतु 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नका.