
औसा तालुक्याला रविवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. तालुक्यातील हासेगाववाडी शिवारात संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झाडाखाली बसलेल्या दोघांच्या अंगावर वीज पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवारी पाच सुमारास तालुक्यातील अनेक भागात विजेचा कडकडाटासह पाऊस झाला. यात हासेगाववाडी (ता. औसा) येथील दोन शेतकरी पावसामुळे एका झाडाचा आसरा घेऊन बसले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात श्रीपती आत्माराम मदने (वय 32) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला दुसरा शेतकरी महादेव प्रकाश मुगळे (वय 38) हा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ लातूरला शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.


























































