रिक्षाचालकाला 1 कोटीचे कर्ज कसं मिळालं? कोर्ट चक्रावले

एका रिक्षाचालकाला सुमारे 1 कोटी रुपयांचं गृहकर्ज मिळाल्याबाबत न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. या रिक्षाचालकाला अनेकांना गंडा घालण्याच्या आरोपांवरून अटक करण्यात आली. त्यावेळी या प्रकाराचा उलगडा झाला आहे.

या रिक्षाचालकाचं नाव हारून सत्तार शेख असं आहे. पंजाब नॅशनल बँकेने शेख, त्याची पत्नी निलोफर शेख आणि हलिमा शेख या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तिघांनी 2019मध्ये 1.8 कोटी इतकं गृहकर्ज घेतलं होतं. पण, त्या कर्जाचे हप्ते न फेडल्याने बँकेने त्याचं नाव 2020मध्येच कर्जबुडव्यांच्या यादीत टाकलं होतं.

शेख याला खोट्या स्कीममध्ये लोकांना पैसे गुंतवायला सांगून त्यांची फसवणूक करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्याच्या संपत्तीविषयी जेव्हा खुलासा झाला, तेव्हा दंडाधिकारी न्यायालय देखील चक्रावले. कारण, शेखच्या नावावर गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर सुमारे 2 कोटी किमतीचा फ्लॅट दिसत होता. शेख हा व्यवसायाने रिक्षाचालक आहे. तरीही त्याला बँकेने 1.8 कोटी इतकं गृहकर्ज दिलं होतं. एका रिक्षाचालकाला इतक्या मोठ्या रकमेचं कर्ज कसं मिळालं, याबाबत न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं.

शेख याने राहत्या घराचंही सुमारे 6.8 लाख इतक घरभाडं अद्याप भरलं नसल्याचंही यावेळी उघड झालं. अखेर, सोमवारी त्याच्या अटकेनंतर न्यायालयाने त्याच्या या घराला टाळं ठोकलं.