मुंबई-नाशिक लोकल गाडी चालवणं अशक्य, रेल्वे अधिकाऱ्यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - संदिप पागडे

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई ते नाशिक दरम्यान लोकल सेवा सुरू करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न निष्फळ ठरणार अशी चिन्ह आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या मार्गावर ई.एम.यू  (Electric Multiple Unit ) म्हणजेच लोकल गाड्या चालवणं योग्य ठरणार नाही असं सांगितलं आहे. या लोकल गाड्या घाटामधील चढण चढण्यास असमर्थ असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांना हा इशारा दिला आहे. या मार्गावर चालवण्यासाठी विशेष गाड्यांची गरज असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावर जो घाटाचा किंवा चढाचा भाग आहे त्या भागामध्ये मुंबईत धावणाऱ्या लोकल गाड्या चालू शकत नाहीत. या भागात जर लोकल गाडी चालवायची असेल तर त्याला बँकरची जोड द्यावी लागेल. बँकर म्हणजे इंजिनाचाच प्रकार असतो जो रेल्वे गाडीला चढावर चढण्यास मदत करत असतो. या मार्गावर लोकल गाडी चालवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने इंटेग्रल कोच फॅक्टरी म्हणजेच ICF ला विशेष लोकलगाडी बनवण्यास सांगितले होते. ही गाडी तयार असून गेल्याच महिन्यात ती मुंबईला पोहोचली आहे. या गाडीच्या चाचण्या लवकरच सुरू होणार असून घाटामध्ये ही लोकल गाडी कशी चालते याकडे विशेष लक्ष दिलं जाणार आहे.

या विशेष लोकल गाडीची चाचणी ही इतिहासात अशा प्रकारची पहिलीच चाचणी असणार आहे. लोकल ट्रेनने लांब पल्ल्याचा प्रवास करताना तीव्र चढण, घाट पार करणं हे याआधी घडलं नव्हतं. या चाचण्या संपल्यानंतर ही लोकल या मार्गावर चालवायची की नाही याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.