
लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे होणारा उशीर टाळण्यासाठी मध्य रेल्वेने 42 लोकल गाड्यांच्या वेळेत बदल करण्याचे ठरवले आहे. काही धीम्या गाड्या या जलद करण्यात येणार आहेत तर काही अर्धजलद गाड्या या धीम्या करण्यात येणार आहे. 14 डिसेंबरपासून वेळापत्रकातील हा बदल लागू होणार आहे.
मध्य रेल्वेने 7 धीम्या गाड्या जलद गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दोन अर्ध जलद गाड्या या धीम्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आला आहे. 6 लोकल गाड्या अशा आहेत ज्यांचे प्रवास संपण्याचे ठिकाण बदलण्यात येणार आहे.
लोकांची वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने कसाऱ्याहून सुटणाऱ्या पहिल्या गाडीच्या वेळेत बदल करायचे ठरवले असून ती थोडी आधी सोडण्याचं ठरवलं आहे. ही गाडी 14 डिसेंबरपासून सध्याच्या वेळेच्या 34 मिनिटे आधी सोडण्यात येणार आहे. सध्या ही गाडी कसाऱ्याहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिसनकडे 4 वाजून 25 मिनिटांनी रवाना होते ती आता 3.51 मिनिटांनी रवाना करण्याचं ठरवण्यात आलं आहे.
गाड्यांच्या वेळात बदल करण्यामागचे मुख्य कारण हे लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे होणारा विलंब टाळणे हे आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी नुकतेच नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल यांच्या वेळा जवळपास सारख्या झाल्या होत्या. उदाहरण द्यायचे झाले तर CSMT हून कर्जतला जायला दुपारी 2.54ची जलद लोकल आहे. दुपारी 2.55 वाजता सेवाग्राम एक्सप्रेस सुटते. साहजिकच आहे, आधी सुटूनही लोकल गाडी थांबवली जाते आणि सेवाग्राम एक्सप्रेस पुढे काढली जाते. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बदललेल्या वेळापत्रकामध्य 2.54 ची सीएसएमटी-कर्जत लोकल सहा मिनिटे आधी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही गाडी नव्या वेळापत्रकानुसार 2.48 मिनिटांनी सुटेल. या बदलामुळे लोकल गाड्यांचा आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा वक्तशीरपणा वाढण्यास मदत होईल असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



























































