त्यांना अधिकृतपणे लोकशाही संपवून टाकायची आहे, आम्ही ते होऊ देणार नाही; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

शिवसेना नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे रविवारी कोल्हापूर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी भाजपला फटकारले.

”महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं आणि देशात इंड़िया आघाडीसाठीच सकारात्मक वातावरण आहे. मात्र जर चुकून जरी भाजप जिंकली तर त्यांचं पहिलं टार्गेट संविधान आहे. त्यांना अधिकृतपणे लोकशाही संपवून टाकायची आहे. ते आम्ही होऊ देणार नाही”, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.

”भाजपचा महाराष्ट्र द्वेष आता सर्वांसमोर आलेला आहे. कालच यांनी सर्वात आधी गुजरातमध्ये कांद्यावरची निर्यांतबंदी हटवली. त्यानंतर टीका झाल्यानंतर 48 तासांनी महाराष्ट्रातली कांद्यावरची निर्यांतबंदी हटवली. यावरून भाजपचा महाराष्ट्रद्वेष समोर येतोय. सगळं काही गुजरातसाठी, मग महाराष्ट्रासाठी काय आहे. आम्ही या देशाचा भाग नाही का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.