Lok Sabha Election 2024 : संजय निरुपम यांना पक्ष विरोधी वक्तव्यं भोवली, काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवलं

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांना पक्ष विरोधी वक्तव्य भोवली आहेत. काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर कारवाई करत स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवले असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसने संजय निरुपम यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्यात आल्याचे वृत्त आहे. सतत पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संजय निरुपम यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली. यावरून संजय निरुपम यांनी आपल्याच पक्षातील वरिष्ठांवर जोरदार टीका केली. काँग्रेस महाविकास आघाडीतील पक्षांसमोर झुकत असल्याची टीका त्यांनी केली होती.

काँग्रेस पक्षाची मुंबईत दादर येथील टिळक भवनामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संजय निरुपम यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तसा प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात आला आहे. संजय निरुपम यांच्यावरील कारवाईबाबत दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडकडून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.