लोकसभेसाठी उमेदवार निवडून आणा विधान परिषदेवर उमेदवारी मिळवा; भाजप-राष्ट्रवादीचे इच्छुकांना गाजर

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करा आणि विधान परिषदेवर नियुक्ती मिळवा असे गाजर ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांनी महायुतीतील नाराज नेत्यांना दाखवले आहे. पुढील एक-दोन महिन्यांत विधान परिषदेवरील अनेक सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडून आणले तर तुमचे राजकीय पुनर्वसन होईल, असे आश्वासन इच्छुक आणि नाराजांना दिले आहे.

राज्यात सत्ता आली तरी सत्तेतील वाटा न मिळाल्याने भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील अनेक नेते नाराज आहेत. सत्ता आली तरी अद्याप सत्तेचा वाटा मिळालेला नाही. महामंडळांवर आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांवर या तीन पक्षांतील नाराजांचा डोळा आहे. या नाराजीतून अनेकजण पक्षाच्या प्रचारापासून लांब राहण्याची शक्यता अशा नाराज नेत्यांना विधान परिषदेवरील रिक्त होणाऱया जागांवर वर्णी लावण्याचे आश्वासन ट्रिपल इंजिन सरकारच्या नेत्यांनी दिले आहे.

रिक्त जागांवर डोळा

सध्या विधान परिषदेतील 78 पैकी अनेक जागा रिक्त आहेत. आता जुलैमध्ये विधान परिषदेवरील आणखी काही सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त जागांची संख्या आणखीन वाढणार आहे. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत. विधानसभेतील सदस्यांकडून विधान परिषदेवर नियुक्त होणाऱया 31 जागांपैकी 11 सदस्य जुलै महिन्यात निवृत्त होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर नियुक्त होणाऱया 22 सदस्यांपैकी सहा सदस्यांचा कार्यकाल मे आणि जून महिन्यात संपुष्टात येत आहे. त्याशिवाय शिक्षक मतदारसंघातील सात सदस्यांपैकी दोन सदस्यांचा कार्यकाल जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे.

विधानसभेतील सदस्यांद्वारे निवडून दिलेले भाजपचे नीलय नाईक, रामराव पाटील, रमेश पाटील, भाई गिरकर जुलैमध्ये निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा दुर्रानी, काँग्रेसचे वजाहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव, शिंदे गटाच्या मनीषा कायंदे, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर यांचा कार्यकाल या वर्षी जुलैमध्ये संपुष्टात येत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून अनिकेत तटकरे यांचा कार्यकाल 31 मे रोजी संपत आहे. त्याशिवाय धाराशीव, लातूर, बीडमधून सुरेश धस यांचा कार्यकाल जूनमध्ये संपत आहे. अमरावतीतून प्रवीण पोटे-पाटील, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीतून रामदास आंबटकर, नाशिकमधून नरेंद्र दराडे, परभणी-हिंगोलीतून विप्लव बजोरिया यांचा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. पदवीधर मतदारसंघाच्या कोकण विभागातून निरंजन डावखरे व मुंबईतून विलास पोतनीस यांचा कार्यकाल 7 जुलै रोजी, तर शिक्षक मतदारसंघातील कपिल पाटील (मुंबई) व किशोर दराडे (नाशिक) यांचाही कार्यकाल 7 जुलै रोजी संपुष्टात येत आहे.