मोदी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्यांनाच भाजपमध्ये घेतात; सासवडमधील सभेत शरद पवार यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी सध्या ज्या पद्धतीने देश चालवत आहेत ते पाहिल्यावर चिंता वाटते, नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीने देशाचा कारभार चालवणं, हे लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पण सध्याचे चित्र वेगळे आहे. मोदी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात त्यांनाच भाजपमध्ये घेतात, असा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सासवड येथील सभेत केला.

महायुतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख सचिन अहिर, आमदार अशोक पवार, दिलीप बारभाई, विजय कोलते, संभाजीराव झेंडे, सुदाम इंगळे, माणिक झेंडे, शंकरनाना हरपळे, अभिजीत जगताप, विकास लवांडे उपस्थित होते. या निवडणुकीत जनतेने काळजीपूर्वक मतदान करावे. आरोप करायचे आणि नंतर त्यांना पक्षात घ्यायचे, असे धोरण भाजपने चालवले आहे, असे शरद पवार यांनी भाषणात सांगितले.

सुप्रिया सुळे यांनी, मी नेहमी मेरिटवर मते मागते. माझ्या आजीने मला रडायला नाही, लढायला शिकवले आहे. आमच्यातील मलिदा गँग निघून गेल्याने आता उलट कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याचे सांगितले. कांदा, दूध, सोयाबीन, कपाशी कशाला भाव नाही. गॅस, डाळी महागल्यात. वीज बिले वाढली, भ्रष्टाचार वाढलाय, हे चित्र बदलण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार संजय जगताप म्हणाले, सुप्रियाताईंच्या माध्यमातून पुरंदर-हवेली मतदारसंघामध्ये मोठय़ा प्रमाणात विकासकामे झाली. केंद्र व राज्य सरकारने गुंजवणी पाणीप्रकल्प, विमानतळ यांसारखी कामे अडवून धरली आहेत. पुरंदर तालुक्यातून सुप्रियाताईंना किमान 50 हजारांचे मताधिक्य देऊ, असे सांगितले.

सुप्रिया सुळे सभेतील लोकांमध्ये जमिनीवर जाऊन बसल्या

महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या सभेतील वक्त्यांची भाषणे ऐकण्यासाठी व्यासपीठासमोर बसलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बसल्या. त्यांना विनंती केल्यानंतर काही वेळानंतर त्या पुन्हा व्यासपीठावर आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘राम कृष्ण हरी- वाजवा तुतारी’ अशा जोरदार घोषणा दिल्या.

10 हजार वर्षात असा हरामखोर झाला नाही – संजय राऊत

शिवसेनेतून खोकेवाले गेले व निष्ठावंत राहिले. पुरंदरला शिवकालीन इतिहास आहे. येथे छत्रपती संभाजी राजांचा जन्म झाला. आचार्य अत्रे यांची पवित्र भूमी आहे. पवार साहेबांनी पक्ष उभा केला, वाढवला, जोपासला आणि तुमच्या हातात दिला, तुम्ही काय केलं? आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते, दहा हजार वर्षात असा हरामखोर झाला नाही, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर केली. संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढवली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी वाढवल़ी मात्र, हे आयत्या बिळावर नागोबा आले. पवार साहेब हे शक्तिमान नेते आहेत. यामुळे दिल्लीकरांना त्यांची कायम भीती वाटते.

महाराष्ट्रातील नेतृत्व खतम करून, स्वाभिमानी पक्ष फोडून सर्व लूट गुजरातला नेण्याचे मोदी व शहांचे धोरण आहे. देशाला खोटं बोलणारा पंतप्रधान लाभणे हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. आता शिंदे गट म्हणायचे नाही, तर शिवसेना फडणवीस गट व राष्ट्रवादी फडणवीस गट असे म्हणावे.