लंडन ब्रिज हल्ला प्रकरण – ‘त्याला’ ब्रिटन संसदेवर 26/11चा हल्ला करायचा होता!

816

लंडन ब्रिजवर चाकू हल्ला करून दोघांची हत्या तर तिघांना जखमी करणाऱया दहशतवाद्याला ब्रिटन संसदेवर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासारखा भीषण हल्ला करायचा होता, असा खुलासा स्कॉटलंड यार्डच्या दहशतवादविरोधी पथकाने केला आहे. अशा प्रकारचा हल्ला करण्यासाठी त्याच्यासह तिघांनी संसदेबाहेरच्या परिसराची टेहळणी केली होती, हल्ला कसा करावा, याचा सरावही केला होता, अशी माहितीही पथकाने दिली. शुक्रवारी झालेल्या हल्ल्यावेळी पथकाने त्याचा खात्मा केला.

लंडन ब्रिजवर चाकू हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचे नाव उस्मान खान (28) असून तो ब्रिटनमध्ये जन्मलेला पाकिस्तानी वंशाचा नागरिक होता. स्टॅफोर्डशायरमध्ये राहणाऱ्या उस्मानला या आधीही दहशतवादी कारवायांना मदत करण्याच्या आरोपाखाली 8 वर्षांची शिक्षा झाली होती. आईबरोबर काही काळ तो पाकव्याप्त कश्मीरमध्येही राहिला आणि लंडनमध्ये परतल्यावर इंटरनेटच्या माध्यमातून तो कट्टरवाद्यांच्या संपर्कात आला, अशी माहिती दहशतवादीविरोधात पथकाचे साहाय्यक आयुक्त नील बसू यांनी दिली.

इसिसने जबाबदारी स्वीकारली
लंडन ब्रिजवर दहशतवादी हल्ला करणारा उस्मान खान हा इसिसचाच दहशतवादी होता, असा दावा इसिसने आज केला. मात्र, खान हा इसिसशी संबंधित होता, याबाबत कोणताही पुरावा दिला नाही. जागतिक दहशतवादविरोधी लढाईत सहभागी देशांमधील नागरिकांना लक्ष्य करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला, असे इसिसने म्हटले आहे.

‘पीओके’त दहशतवादी तळ चालवला
उस्मानला लंडनमधील न्यायालयाने 2012 साली दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवत त्याला 8 वर्षांची शिक्षा दिली. दहशतवाद पसरवणे, दहशतवादी कारवायांसाठी, प्रशिक्षणासाठी निधी गोळा करणे, नियमांचे उल्लंघन करून परदेशी जाणे असे आरोप त्याच्यावर होते. त्याच्यावर पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण तळ उभारणे आणि चालवण्याचा आरोपही आहे. दहशतवाद पसरवणारा आणि समाजाविरोधात दीर्घकालीन कारवाया करणारा, असा ठपका ठेवला होता. 2018मध्ये तो पॅरोलवर सुटला होता.

आपली प्रतिक्रिया द्या