मोठ्यानं बोलू नका! सरन्यायाधीशांचा वकिलाला कडक इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
घटनापीठाचा भाग असलेले न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.

देशाचे सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड यांनी आज एका वकिलाला एका याचिकेच्या यादीवरून झालेल्या चर्चेदरम्यान खडसावले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला त्याच्या टोनबद्दल फटकारलं आणि तावातावानं बोलण्याच्या प्रयत्नांवरून इशारा दिला.

न्यायालयात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला थांबवलं आणि आवाज कमी ठेवत सौम्य भाषेत बोलण्याचा इशारा दिला. ‘एक सेकंद, तुमचा आवाज कमी करा. तुम्ही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहात; तुमचा आवाज कमी करा, अन्यथा, मी तुम्हाला कोर्टातून काढून टाकेन’, असं ते म्हणाले.

त्यांनी वकिलाच्या नेहमीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले, ‘तुम्ही साधारणपणे कुठे असता? तुम्ही प्रत्येक वेळी न्यायाधीशांवर असेच ओरडता का?’

सरन्यायाधीशांनी न्यायालयात चांगल्या वर्तणुकीच्या महत्त्वावर भर देताना सांगितलं की, ‘कृपया आधी तुमचा आवाज कमी करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमचा आवाज वाढवून आमच्यावर प्रभाव पाडू शकता, तर तुमची चूक आहे. 23 वर्षांत असं घडलं नाही; माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षातही असं होणार नाही’.

सरन्यायाधीशांच्या कडक इशाऱ्यानं वकिलानं तातडीनं माफी मागितली आणि सौम्य शब्दात बोलण्यास सुरुवात केली.