
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा (Lok Sabha Election 2019) निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी विविध पक्ष आघाडी स्थापन करून विजयासाठी आपला जोर आजमावत आहेत. याच पार्श्वभूमिवर आंध्र प्रदेशमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण याचा पक्ष जन सेना पार्टीने मायावतींच्या बहुजन समाज पक्षासोबत लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर बोलताना जन सेना पक्षाचा प्रमुख पवन कल्याण याने मायावतींना पंतप्रधानपदाची शपथ घेताना पाहायचे आहे, असे विधान केले.
एएनआय या वृत्तसंस्थेने ट्वीट करून आंध्र प्रदेशमध्ये बसपा आणि जन सेना पक्षामध्ये आघाडी झाल्याची माहिती दिली. यावेळी बोलताना जनसेवा पक्षाचे प्रमुख पवन कल्याण म्हणाले की, बहनजी (मायावती) यांना देशाचा पंतप्रधान होताना पाहायचं आहे. माझी ही मनापासून इच्छा आहे.
Jana Sena Chief Pawan Kalyan after alliance with BSP: We would like to see Behen ji Mayawati ji as the Prime Minister of our country, this is our wish and our ardent desire. pic.twitter.com/HtF17cfi4T
— ANI (@ANI) March 15, 2019
दाक्षिणात्या सुपरस्टार आणि चिरंजीवीचा लहान भाऊ पवन कल्याण याने 14 मार्च 2014 ला जन सेना पक्षाची स्थापना केली होती. पवन कल्याण याने आंध्र प्रदेश आणि तेलंगानामध्ये भाजप आणि टीडीपीविरोधात जोरदार प्रचार केला होता. परंतु या वेळेस पवन कल्याण हे मायावती यांच्या बसपासोबत आघाडी करत राज्यामध्ये उलथापालथ करण्याच्या प्रयत्नात आहे. पवन कल्याण याला दाक्षिणेकडील चित्रपटातील ‘गब्बर सिंह’ असे म्हटले जाते.

























































