
सामना ऑनलाईन,पुणे
पु. ल. देशपांडे यांनी आपल्या लेखन आणि कलाकृतीमधून लोकांचे केवळ मनोरंजन केले नाही, तर जीवन किती सुंदर आहे हेसुद्धा सांगितले. आजच्या कृत्रिम काळामध्ये पुलंच्या लिखाणाची गरज असून आजच्या तरुणांमध्ये पु. ल. देशपांडे यांच्या लेखणाचे संस्कार झिरपले पाहिजेत, अशी भावना ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांनी व्यक्त केली.
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित पुलोत्सवात ‘नाटक आणि सिनेमातील पु. ल. देशपांडे’ या विषयावरील परिसंवादामध्ये माधव वझे बोलत होते. ज्येष्ठ लेखक आनंद माडगूळकर, दिग्दर्शक किरण यज्ञोपवित यावेळी उपस्थित होते. राजेश दामले यांनी निवेदन केले. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
माधव वझे म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीमध्ये पु. ल. देशपांडे यांचे मोठे योगदान होते. पु. ल. देशपांडे यांनी आपल्या कलाकृतीतून जसे अनेकांना हसविले त्याचप्रमाणे त्यांनी अनेकांना घडविलेही. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कामाचे महत्त्व त्यांनी कायम आपल्या सहकलाकारांना सांगितले. पु. ल. देशपांडे यांचे नाटक हे चांगल्या लेखनामुळे कायम श्रवणीय होते.
आजच्या कलाकारांवर पुलंच्या कामाचा प्रभाव
आयुष्यात आलेल्या अनुभवातून शिकत जाणे हा पु. ल. देशपांडे यांचा स्थायिभाव होता. त्यांनी कधीही कोणत्याही कलेचे शिक्षण घेतले नाही, परंतु त्यांना इतारांना हसविण्याची आणि त्यातून शिक्षण देण्याची कला मात्र आत्मसात झाली होती, असे आनंद माडगूळकर म्हणाले. तर किरण यज्ञोपवित यांनी सांगितले की, ‘‘पु. ल. देशपांडे यांना प्रत्यक्ष रंगमंचावर काम करताना आम्ही पाहिले नसले तरी त्यांच्या कामाचा प्रचंड प्रभाव आजच्या कलाकारांवर पडलेला आहे.’’
पत्रातून उलगडले ‘पुलंचे पोस्टिक जीवन’
माझ्यावरील प्रेमापोटी लोक पोस्टात जातात… कार्ड आणि पाकीट विकत घेतात… शक्ती, वेळ आणि पैसा खर्च करून पत्र पाठवतात… त्यांच्या पत्राची दखल न घेणं हे मला कृतघ्नपणाचे वाटते, म्हणूनच आलेल्या नव्वद टक्के पत्रांना मी उत्तरे दिली असं म्हणत सामान्य रसिकांपासून ते दिग्गज कलावंतापर्यंत सर्वांशी पत्राच्या माध्यमातून मैत्र जोडणाऱ्या ‘पुलंचे पोस्टिक जीवन’ पुलोत्सवात उलगडले.
पुलंनी लिहिलेल्या आणि पुलंना आलेल्या निवडक पत्रांचे अभिवाचन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, अभिनेत्री मधुरा वेलणकर, प्रवीण जोशी यांनी केले. हा दुर्मिळ पत्रांचा खजिना ज्योती आणि दिनेश ठाकूर यांनी उपलब्ध करून दिला. अकरावीत शिकणाऱ्या मुलांना मार्गदर्शन मिळावे यासाठी पुलंना लिहिलेले पत्र आणि उपदेश न करता हसत खेळत वडीलकीच्या नात्याने दिलेले उत्तर, लग्न जमलेल्या तरुणाला सुखी संसारासाठीची सूत्र सांगणारे पत्र, लग्न मोडायला निघालेल्या तरुणीला लग्नासारख्या नाजूक विषयावर केलेलं मार्गदर्शन आणि रॉयल्टी न देता गुपचूप ‘अंमलदार’ नाटकाचे प्रयोग करणाऱ्या नाटक मंडळांची काढलेली खरडपट्टी अशा वेगवेगळय़ा विषयांवरच्या पत्रांचे अभिवाचन ‘पुलंमधल्या माणूसपणाचे’ दर्शन घडविणारे ठरले.




























































