मढीला भाविकांची गर्दी, पण यात्रा फुललीच नाही; कोट्यवधींची उलाढालही हजारांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कानिफनाथांचा जयघोष करत पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी घेतला. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीचा परिणाम यात्रेवरही झाला. दरवर्षीच्या तुलनेत भाविकांची संख्या कमी असल्याने त्याचा फटका यात्रेतील व्यावसायिकांना बसला आणि कोट्यवधींची उलाढाल हजारांवर आली. दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी दर्शन होताच लगेच माघारी जाणे पसंद केल्याने मढीची यात्रा फुललीच नाही. तसेच नियमितपणे भरणारा गाढवांचा बाजार तिसगाव येथे भरवण्यात आल्याने या बाजारातही मोठी उलाढाल झाली नाही.

भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मढी येथे कानिफनाथांनी रंगपंचमीच्या दिवशी संजीवन समाधी घेतल्याने भाविकांच्या दृष्टीने या दिवसाला मोठे महत्व असते. शुक्रवार सकाळ पासूनच नाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली. मात्र तुलनेने भाविकांची संख्या रोडावल्याने मुख्य गडावर गर्दी उसळली नाही. त्यातच देवस्थान समितीने प्रथमच मुख्य मंदिरातील दक्षिण व उत्तरेकडील दरवाजे दर्शनानंतर जाण्यासाठी उघडे ठेवल्याने भाविकांना कमी वेळात दर्शन घेऊन बाहेर पडणे सुलभ झाले.

दरवर्षी अस्तन्या घेऊन येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते. एका अस्तन्या बरोबर शेकडो भाविक गडावर येतात. मात्र चालू वर्षी भाविकांनी गर्दी न करता मोजक्याच भाविकांनी अस्तन्या वाजत-गाजत आणून मंदिराच्या कळसाला टेकवल्या. नाथांची नैवेद्य म्हणून अनेक भाविक मढी येथीलच आमराई व मंदिर लगतच्या परिसरात राहुटी टाकून बसत नैवैद्य तयार करतात. मात्र चालू वर्षी या भाविकांनी मंदिर परिसरात नैवैद्य न बनवता मंदिरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतर लांब जाऊन नैवेद्य तयार करणे पसंद केल्याने या वेळी आमराईत फारशी गर्दी जाणवली नाही.

मढी येथे गावरान व काठेवाडी गाढवांचा बाजार भरतो व त्यात मोठी आर्थिक उलाढाल होऊन मढी ग्रामपंचायतीला चांगले उत्पन्न मिळते. मात्र चालू वर्षी खबरदारीचा उपाय म्हणून हा बाजार तिसगाव येथे हलवण्यात आल्याने या बाजारात फारशी उलाढाल झाली नाही. दरवर्षी मढी येथे परिवहन मंडळ तात्पुरते बसस्थानक उभारते मात्र चालू वर्षी भाविक येणार नाही हे गृहीत धरून चालू वर्षी मढी येथे बसस्थानक उभारण्यात आले नाही. मात्र जिल्ह्याच्या तीन आगारातून मढी येथून जिल्ह्यात सर्व आगारात जाण्यासाठी पन्नास बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.

चालू वर्षी भाविकांची संख्या कमी असल्याने बाजारात मोठी उलाढाल न झाल्याने स्टेशनरी, खेळणी, सौंदर्य प्रसाधने, रेवडी, नारळ, हार या दुकानात फारशी गर्दी दिसून आली नाही. नाथांचा प्रसाद म्हणून भाविक रेवडी मंदिरावर उधळतात. गेल्या वर्षी रेवडीचा दर हा 120 रुपये किलो होता तो या वेळी 80 रुपये किलोवर आला.

देवस्थान समितीने खबरदारीचा उपाय म्हणून देवस्थानचे कर्मचारी, पोलीस यांना सर्वांना मास्कचे मोफत वाटप केले होते तर संपूर्ण यात्रेत खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना संदर्भात जागृतीचे फलक लावले होते. दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचे देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, विश्वस्त मिलिंद चवंडके,सुनील सानप व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांनी स्वागत केले.