उमेद – वॉटर टँक स्कूल: निस्पृहतेचा अद्भुत आदर्श

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> माधुरी म्हैसकर

निरुपयोगी ठरलेल्या पाण्याच्या टाकीचे रूपांतर एका बहुमजली भव्य वर्गात करून शेकडो गरीबांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे हे अद्भुत कार्य डॉ. पोथुकुची श्रीनिवास यांनी प्रत्यक्षात आणले आहे.

हैदराबादमधील मियापूर भागातील एका शांत कोपऱयात उभ्या असलेल्या पाण्याच्या जुन्या टाकीने शेकडो गरीब मुलांच्या आयुष्यात प्रकाशाचे एक नवे पर्व सुरू केले आहे. सुरक्षा रक्षक, घरकामगार आणि अत्यंत अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुले रोज संध्याकाळी या अनोख्या वर्गात एकत्र येतात आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने विणतात. कधीकाळी निरुपयोगी ठरलेल्या पाण्याच्या टाकीचे रूपांतर एका बहुमजली भव्य वर्गात करून शेकडो गरीबांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे हे अद्भुत कार्य डॉ. पोथुकुची श्रीनिवास यांनी प्रत्यक्षात आणले आहे. त्यांच्या या जिद्दीच्या आणि त्यागाच्या प्रवासाने आजवर 1,500हून अधिक विद्यार्थ्यांचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले आहे.

या संपूर्ण चळवळीची सुरुवात डॉ. पोथुकुची श्रीनिवास यांच्या एका धाडशी आणि संवेदनशील निर्णयाने झाली. 1990च्या दशकात ते एका नामांकित जर्मन कंपनीत उत्तम पगाराची कॉर्पोरेट नोकरी करत होते. नोकरी सांभाळून ते कार्यालयीन वेळेनंतर एका शासकीय शाळेत स्वयंसेवक म्हणून गरीब मुलांना शिकवण्याचे काम करत असत. यादरम्यान त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली. एका विद्यार्थ्याने गृहपाठ न केल्यामुळे श्रीनिवास यांनी त्याला त्याचे कारण विचारले, तेव्हा त्या मुलाने सांगितलेली परिस्थिती अत्यंत विदारक होती. तो मुलगा संध्याकाळच्या वेळी चहाच्या गाडय़ा विसळण्याचे आणि स्वच्छतेचे काम करत असे, जेणेकरून कुटुंबाला थोडा हातभार लागेल. अत्यंत गरिबी आणि घरात विजेचा दिवा उपलब्ध नसल्यामुळे त्याला रात्री अभ्यास करणे अशक्य होत होते. या एका घटनेने श्रीनिवास यांचे मन हेलावून सोडले. मुलांमध्ये बुद्धिमत्ता किंवा क्षमतेची कोणतीही कमतरता नाही, तर खरी अडचण केवळ गरिबी आणि साधनांचा अभाव हीच आहे, याची तीव्र जाणीव त्यांना झाली. या जाणिवेतूनच त्यांनी आपली सुखासीन कॉर्पोरेट नोकरी कायमची सोडण्याचा आणि आपले उर्वरित आयुष्य या वंचित मुलांच्या शिक्षणासाठी समर्पित करण्याचा अत्यंत धाडशी निर्णय घेतला.

आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकत त्यांनी 2003मध्ये वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पोथुकुची सोमसुंदरा सोशल वेल्फेअर अँड चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी अत्यंत लहान प्रमाणावर आपल्या स्वतच्या घरातूनच या गरीब मुलांना मोफत शिकवण्यास सुरुवात केली. जसजसा वेळ सरत गेला तसतशी परिसरातील मजुरांची, रिक्षाचालकांची आणि सुरक्षा रक्षकांची मुले मोठय़ा संख्येने त्यांच्याकडे येऊ लागली. विद्यार्थ्यांची संख्या झपाटय़ाने वाढल्यामुळे जागेची मोठी टंचाई भासू लागली. या समस्येवर मात करण्यासाठी 2008मध्ये त्यांनी एक अत्यंत नावीन्यपूर्ण प्रयोग केला. परिसरातील एका उंचावरील निरुपयोगी आणि जुन्या पाण्याच्या टाकीचे त्यांनी अभ्यासाच्या वर्गात रूपांतर केले. या पाण्याच्या टाकीच्या वेगवेगळ्या मजल्यांवर शालेय विद्यार्थ्यांपासून ते पदविका आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱया उच्च शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी हक्काची जागा तयार झाली.

हा उपक्रम केवळ मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यापुरता मर्यादित राहिला नाही तर तो या विद्यार्थ्यांसाठी एक भक्कम आधारवड बनला. या ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत शिक्षण, दर्जेदार कोचिंग, पुस्तके, गणवेश आणि वाहतुकीची मोफत सोय उपलब्ध करून दिली जाते. उच्च शिक्षण घेणाऱया गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लॅपटॉपही दिले जातात. संध्याकाळच्या वर्गानंतर गरीब कुटुंबांतील मुलींना सुरक्षितपणे घरापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्थाही केली जाते.

या अनोख्या ‘वॉटर टँक स्कूल’ शाळेने आजवर अनेक यशस्वी व्यावसायिक देशाच्या मुख्य प्रवाहात आणले आहेत. या संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेचे सर्वात मोठे आणि हृदयस्पर्शी वैशिष्टय़ म्हणजे येथील ‘ऋण फेडण्याची संस्कृती.’ या संस्थेतून शिकून, मोठे होऊन समाजात मानाचे स्थान मिळवलेले जुने विद्यार्थी आपल्या मुळांना विसरत नाहीत. ते पुन्हा याच पाण्याच्या टाकीच्या शाळेत परत येतात आणि आपल्यासारख्याच इतर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. यशस्वी झालेल्या जुन्या विद्यार्थ्यांकडून नव्या पिढीला मिळणाऱया या ज्ञानाच्या दानामुळे हे शैक्षणिक चक्र अविरतपणे सुरू आहे. एका संवेदनशील माणसाने कॉर्पोरेट जगाचा त्याग करून लावलेले हे छोटेसे रोपटे आज एका मोठय़ा लोकचळवळीत बदलले असून गरीबांच्या मुलांच्या महत्त्वाकांक्षांना पंख देणारे हक्काचे केंद्र ठरले आहे.