
देशात सर्वत्र धुलिवंदनाचे वातावरण असताना मध्य प्रदेशमध्ये `राजकीय धुळवड’ चांगलीच रंगात आली आहे. काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत मध्य प्रदेश काँग्रेसला धक्का दिला असून ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेशातील राजकीय उलथापालथीमुळे बंगळुरूमध्ये आश्रयास गेलेल्या ज्योतिरादित्य समर्थक काँग्रेसच्या सहा मंत्र्यांसह 22 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडेच थेट विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा धाडला. यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वातील मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार अल्पमतात आले आहे.
मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षातून मध्य प्रदेशमध्ये 3 मार्चपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा प्रयोग ऐन धुळवडीच्या दिवशी अंतिम टप्प्यात पोहचला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याबाबतचे पत्र त्यांनी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी ट्विट केले. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांतच काँग्रेसने ज्योतिरादित्य यांना काँग्रेसमधून काढून टाकल्याचे जाहीर केले.
पक्ष विरोधी कारवायांचा ठपका ठेवत काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षातून काढण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देखील बंगळूरमध्ये आश्रयास गेलेल्या ज्योतिरादित्य समर्थक सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. यामध्ये इमरती देवी, तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, महेंद्र सिंह सिसोदिया, प्रद्युमन सिंह तोमर आणि डॉ. प्रभुराम चौधरी या मंत्र्यांचा समावेश आहे.
ज्योतिरादित्य भाजपकडून राज्यसभेवर?
राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 26 मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येईल. राज्यसभेत प्रवेश होताच, मध्य प्रदेशातील बंडाबद्दल बक्षीस म्हणून केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
सपा, बसपा आमदार भाजपच्या संपर्कात
मुख्यमंत्री कमलनाथ यांची काँग्रेस आमदारांनीच साथ सोडल्यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारला समर्थन देणाNया समाजवादी पार्टी आणि बसपा आमदारही भाजपच्या संपर्कात आहेत. सपा आमदार राजेश शक्ला आणि बीएसपी आमदार संजीव कुश्वाहा यांनी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेऊन चर्चा केली.
सचिन पायलट, मिलिंद देवरा यांच्या भूमिकेकडे लक्ष
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या भूमिकेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. ज्योतिरादित्य यांच्यापाठोपाठ पायलटही काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश करतील का यावरुन सोशल नेटवर्वâवर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, यापूर्वी माजी खासदार आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते मिलिंद देवरा यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपाचे समर्थन केले होते. भाजपाच्या काही धोरणात्मक निर्णयाला जाहीरपणे पाठिंबा देत, मोदींचे कौतुकही केले होते.
काँग्रेसच्या या 22 आमदारांचा राजीनामा
मध्यप्रदेशमधील राजकीय उलथापालथीनंतर काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामे दिले. यामध्ये रघुराज कंसाना, कमलेश जाटव, रक्षा संत्राव, जजपालसिंग जज्जी, सुरेश धाकड, ओपीएस भदौरिया, रणवीर जाटव, गिरराज दंडोतिया, जसवंत जाटव, हरदीप डंग, मुन्नालाल गोयल, बिजेंद्र यादव, राजवर्धन सिंग, एंदल सिंग कंसाना, मनोज चौधरी, बिसाहूलाल साहू, इमरती देवी, प्रभुराम चौधरी, तुलसी सिलावट, महेंद्रसिंग सिसोदिया, प्रद्युमनसिंग तोमर, गोविंद राजपूत यांचा समावेश आहे. काँग्रेसचे आणखी 7 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ज्योतिरादित्य यांची घरवापसी – यशोधरा शिंदे
ज्योतिरादित्य शिंदे यांची आज घरवापसी झाली अशी प्रतिक्रिया त्यांची आत्या व भाजप नेत्या यशोधरा शिंदे यांनी दिली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जनसंघापासून केली होती. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमध्ये कायमच दुर्लक्षित राहिले. त्यामुळे ते भाजपात येत आहेत ही आनंदचीच गोष्ट आहे. मी त्यांचे अभिनंदन करते असंही यशोधरा शिंदे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस म्हणते, कमलनाथ यांचा मास्टर स्ट्रोक बाकी
मध्य प्रदेशातील राजकारणात भूकंप आलेला असताना मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मास्टर स्ट्रोक अजून बाकी आहे, असा दावा काँग्रेसने केलाय. काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे सरकार बहुमताचा आकडा कसा गाठणार? असा प्रश्न काँग्रेस नेते पी.सी. शर्मा यांना करण्यात आला असता मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मास्टर स्ट्रोक तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल’, असं उत्तर शर्मा यांनी दिले. नाराज आमदारांना मंत्रीपद देऊन काँग्रेसमध्ये थांवबविण्याचा प्रयत्न कमलनाथ यांच्याकडून सुरू आहे. कमलनाथ हे आपल्या निकटवर्तीय नेत्यांच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय.
मध्य प्रदेश विधानसभेचे पक्षीय बलाबल
मध्य प्रदेश विधानसभेत एकूण 230 जागा आहेत. 230 मधील 2 जागा सध्या रिक्तआहेत. त्यामुळे सध्या विधानसभेत 228 आमदार आहेत. ज्यामध्ये 114 काँग्रेस, 107 भाजप, 4 अपक्ष, 2 बहुजन समाज पक्ष आणि 1समाजवादी पक्षाचा आमदार आहे. काँग्रेसला या चारही अपक्ष आमदारांसह बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाचा पाठिंबा आहे.
संकट टाळण्यासाठी कमलनाथ यांनी घेतले 20 मंत्र्यांचे राजीनामे
मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारवर आलेले संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सोमवारी रात्रीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी मंत्रिमंडळास राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार मंत्रिमंडळातील 20 मंत्र्यांनी कमलनाथ यांना आपले राजीनामे सादर केले. शिवाय कमलनाथ यांना मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी मंत्र्यांनी अधिकारही दिले.
मी काँग्रेसमध्ये काम करू शकणार नाही – ज्योतिरादित्य
मी गेल्या 18 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे. आता मी नव्याने सुरुवात करून पुढे जाण्याची वेळ आली आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझे जनसेवेचे उद्दिष्ट पूर्वीपासून राहिले आहे. हे काम काँग्रेस पक्षात राहून यापुढे करू शकणार नाही. मला देशसेवेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
आणखी चार आमदार गायब
काँग्रेसचे आणखी चार आमदार गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशमधील राजकीय उलथापालथीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंगळवारी संध्याकाळी बोलविलेल्या बैठकीस 92 आमदारांनी हजेरी लावली. यामध्ये काँग्रेसच्या 88 तर 4 अपक्ष आमदारांचा समावेश होता.
आकडय़ांचा खेळच राजीनामे मंजूर झाले तर भाजपचे सरकार येईल.
- एकूण सदस्य 230 (दोन जागा रिकामी) 228
- 22 आमदारांचा राजीनामा – 22
- राजीनामा मंजूर झाले तर संख्याबळ 206
- बहुमतासाठी आवश्यक आकडा 104
- भाजप – 107 (काँग्रेसमधून भाजपात आलेल्या सदस्यांची आमदारकी रद्द होणार)
- काँग्रेस – 99 (काँग्रेस 92, बसप 2, सपा 1, अपक्ष 4)




























































